नाशिक :रेल्वे स्थानकातील एका हॉटेलमध्ये जेवण करताना पोळी दिली नाही, म्हणून आमदार सुहास कांदे यांच्या अंगरक्षकानं वेटरवर चक्क बंदूक रोखल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. विशाल झगडे असं त्या आमदार सुहास कांदे यांच्या अंगरक्षकाचं नाव आहे. या प्रकरणी अंगरक्षक विशाल झगडे याच्याविरोधात नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वेटरनं पोळी उशीरा दिली म्हणून रोखली बंदूक :पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाशिकरोड रेल्वे स्थानकाजवळ रामकृष्ण हॉटेलमध्ये पोलीस अमलदार विशाल झगडे हा जेवणासाठी गुरुवारी 9 जानेवारी रोजी रात्री साडेबारा वाजता गेला होता. तक्रारदार हॉटेल व्यवस्थापक सागर पाटील यांच्या हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करणाऱ्या सिरॉन शेख यांनी विशाल झगडे याला ऑर्डर घेताना पोळी नसल्याचं सांगितलं. त्यावर विशाल झगडे आणि त्याच्यासोबत असलेल्या दोघांनी वाद घालत दमबाजी केली. पोलीस अमलदार विशाल झगडे यानं त्याच्या कमरेला असलेली पिस्तूल काढून शेख यांच्यावर रोखली. "मला रोटी पाहिजे तू तिकडे काहीही कर," असं म्हणतं शिवीगाळ केल्याचं तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे. सागर पाटील यांनी ही बाब हॉटेल मालक विनोद भगत यांना सांगितली. यावेळी अन्य वेटरनं पंधरा-वीस दिवसापूर्वी याच व्यक्तीनं किरकोळ कारणावरून हॉटेलमध्ये वाद घातला होता, अशी माहिती दिली. बंदूक रोखणारा संशयित नाशिक पोलीस ग्रामीण मुख्यालयातील कर्मचारी आणि आमदार सुहास कांदे यांचा अंगरक्षक विशाल झगडे असल्याची माहिती सूत्रांनी दिली.