जळगाव :विधानसभा निवडणूक 2024 च्या निकालात महायुतीला यश मिळालं. या निकालानंतर मुख्यमंत्री पदावरुन रंगलेल्या राजकारणावरुन उबाठा खासदार संजय राऊत यांनी महायुतीवर जोरदार टीका केली. त्यांच्या आरोपावर गुलाबराव पाटील यांनी जोरदार पलटवार केला. "संजय राऊत आमच्या ताटात जेऊन खासदार झाले, त्यांचं डोकं सडकं झालं. त्यामुळे संजय राऊतांवर काय बोलावं," असा सवाल त्यांनी केला. त्यामुळे गुलाबराव पाटील आणि संजय राऊत यांच्यात चांगलाच कलगीतुरा रंगण्याची शक्यता आहे.
संजय राऊत यांची एकनाथ शिंदे यांच्यावर टीका :खासदार संजय राऊत यांनी काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली. एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करताना संजय राऊत यांनी त्यांना बरं करण्यासाठी मांत्रिकाला घेऊन जावं लागेल, तेव्हाच ते ठीक होतील, अशी टीका केली. यावरुन गुलाबराव पाटील यांनी संजय राऊतांवर जोरदार टीका केली. याबाबत बोलताना ते म्हणाले, "संजय राऊत यांच्या अंगातच भानामती आहे. संजय राऊत म्हणजे सडलेलं डोकं आहे, त्यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर बोलण्याची लायकी नाही. संजय राऊत आमच्या ताटात खाऊन राज्यसभेचे खासदार झाले. त्यामुळे त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर बोलू नये. एका स्ट्रोकमध्ये 57 आमदार निवडून आणणारे एकनाथ शिंदे आहेत."
राष्ट्रवादी-शिवसेनेच्या जागा कमी झाल्या :मुख्यमंत्री पदावरुन महाराष्ट्रात घोडं अडलं आहे. मात्र याबाबत बोलताना मंत्री गुलाबराव पाटील यांनी मोठं भाष्य केलं. "नेमक्या काय चर्चा सुरू आहेत, काय निर्णय होईल, ते आमच्या हातात नाही. मात्र महायुतीची बैठक होईल, त्यात निर्णय घेण्यात येईल. त्याबाबत एकनाथ शिंदे यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे." राष्ट्रवादी काँग्रेसमुळे शिवसेनेच्या जागा कमी झाल्या असा आरोप करण्यात येत आहेत. याबाबत बोलताना अजित पवार यांना सोबत घेतलं, त्यावेळेस आम्ही विरोध केला नाही. हिंदुत्व म्हणून आम्ही सोबत आलो, मात्र तरीही त्यावेळी अजित पवार यांना सोबत घेतलं गेलं. पण आम्ही विरोध केला नाही. त्यावेळी त्यांना सोबत घेतलं नसतं, तर शिवसेनेलाही सव्वाशे जागा मिळाल्या असत्या. आमच्याही शंभर जागा निवडून आल्या असत्या. शेवटी केंद्र सरकारच्या फायद्यासाठी आम्ही भाजपाला मदत केली. केवळ नरेंद्र मोदी पंतप्रधान व्हावे, यासाठी आम्ही कुठलीही आडकाठी केली नाही. सर्व गोष्टींमध्ये तडजोड केली, असंही त्यांनी यावेळी सांगितलं.
हेही वाचा :
- एकनाथ शिंदे वेगळं रसायन, नाराज हा शब्द त्यांच्या जीवनात नाही- गुलाबराव पाटील
- एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत हे सर्वसामान्य जनतेला वाटणं स्वाभाविक - गुलाबराव पाटील
- Gulabrao Patil : रक्ताच्या नात्यात भेट घेणं काय वाईट? : मंत्री गुलाबराव पाटील