बीड Kundlik Khande Arrested : शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांना रात्री जामखेड येथून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं अटक केली होती. त्यांना माऊली खांडे यांच्या मारहाण प्रकरणात दाखल असलेल्या गुन्ह्यात आता बीड ग्रामीण पोलिसांनी (Beed Rural Police) ताब्यात घेतलं आहे. माऊली खांडे हे गावी जात असताना एप्रिल महिन्यात काहीजणांनी त्यांच्यावर हल्ला केला होता. या प्रकरणात कुंडलिक खांडे यांच्यासह दहा ते बारा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याच प्रकरणात कुंडलिक खांडे यांना रात्री अटक करण्यात आली असून आता त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती, पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांनी दिलीय.
पोलिस यंत्रणा अलर्ट मोडवर :कुंडलिक खांडे यांच्यावर एप्रिल महिन्यात गुन्हा दाखल झाला होता. तेव्हापासून पोलिसांनी त्यांना अटक केली नव्हती. परंतु आता व्हायरल ऑडिओ क्लिपनंतर पोलीस यंत्रणा अलर्ट मोडवर येत जामखेड येथून कुंडलिक खांडे यांना अटक केली आहे. एव्हढेच नाही तर कुंडलिक खांडे यांनी लोकसभा निवडणूक प्रचारातही सहभाग घेतला होता. परंतु तेव्हाही त्यांना अटक झाली नव्हती. आता या अटकेचा मुहूर्त पोलिसांनी शोधल्यानं आश्चर्य व्यक्त होत आहे.