नागपूर: जीवनात संधीचं एक कवाड बंद झालं तर दुसरी कवाडे खुली होतात, असं म्हटलं जातं. असाच अनुभव नागपूरमधील आदिवासी समाजातून आलेल्या शाळाबाह्य मुली घेत आहेत. शिक्षणापासून दूर गेल्यानंतर या मुलांचा क्रिकेट संघ हा कौतुकाचा विषय ठरत आहे.
नागपूर शहराच्या एका टोकाला सिद्धेश्वर गोड वस्ती आहे. या वस्तीमध्ये सुमारे दोन हजार लोक राहतात. या वस्तीमधील काही कचरा वेचण्याबरोबरच चोऱ्यामाऱ्या करतात असा आरोप होतो. अशा सिद्धेश्वर वस्तीत राहणाऱ्या मुलांसाठी प्राथमिक शिक्षणाची सोयदेखील उपलब्ध नाही. त्यामुळे वस्तीतील मुलं अन मुलीदेखील व्यसनांच्या आहारी जाऊ लागल्यां चित्र होतं. ही अत्यंत भयावह परिस्थिती समाजसेवक ढोक यांना दिसून आली. त्यांनी या सर्व मुलींच्या जीवनाला आकार देण्याचा निश्चय केला.
दीड वर्षांपासून क्रिकेटचा सराव सुरू- सुरुवातीला या मुलींमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा सर्व मुलींचा खेळण्यात अधिक कल दिसून आला. त्यामुळे खुशाल ढोक यांनी अनेक प्रकारचे खेळ मुलींना खेळण्यासाठी प्रोत्साहन दिले. मात्र, सर्व मुलींना क्रिकेटमध्ये जास्त रुची जास्त होती. त्यामुळे त्यांनी मुलींना क्रिकेटचे धडे देण्यास सुरुवात केली. अशा प्रकारे साधारपणे एक ते दीड वर्षांपूर्वी या मुलींचा नवा प्रवास सुरू झाला. आज या मुली प्रोफेशनल क्रिकेट खेळत आहेत. खुशाल ढोक यांच्या मार्गदर्शनात या मुली एकाग्रतेनं क्रिकेटवर लक्ष केंद्रित करत आहेत.
आम्हाला क्रिकेट आणि अभ्यास दोन्ही गोष्टी करता येत आहेत. सर आणि मॅडम यांनी मदत केली आहे- क्रिकेटपटू राधा मलकाम
शाळाबाह्य असूनही जपानी भाषेचं ज्ञान- आदिवासी समाजाच्या मुली कधीही शाळेत गेल्या नाहीत. त्यामागील कारण म्हणजे त्यांच्याकडं स्वतःची जन्मदाखल्यासारखी आवश्यक कागदपत्रे नाहीत. त्यामुळे खुशाल ढोक यांच्या सेवा सर्वदाय संस्थेनं या सर्व मुलींसाठी रात्रीची शाळा सुरू केली आहे. यापैकी अनेक मुली या जपानी भाषादेखील बोलण्याचा प्रयत्न करत आहेत. या खेळाडूंना शिक्षणासोबतचं क्रिकेटचे प्रशिक्षण दिल्यास भारताला चांगले खेळाडू इथे मिळू शकतात, अशा विश्वास समाजसेवक ढोके यांना वाटतो.
खेळाडू जन्मजात असतात. त्यांना तयार करण्याची गरज असते. येथील झोपडपट्टीत असलेली मुले देशाला देऊ शकतात. पाणी, रस्ते आणि शौचालयांची व्यवस्था नाही. या मुलांकडं सरकारनं किंवा क्रीडा विभागानं लक्ष दिल्यास आपल्याकडं पदक जास्त मिळतील-समाजसेवक, खुशाल ढोक
भविष्यातील स्मृती मानधाना येथेचं घडणार-सकाळी उठल्यापासून अंधार पडेपर्यंत मुली मैदानात क्रिकेटचा नेटमध्ये सराव करत असतात. यापैकी कुणी बॅटिंग तर कुणी बॉलिंगमध्ये तरबेज आहे. मध्यंतरीच्या काळात या मुलींनी काही क्रिकेट सामनेदेखील जिंकले त्यावेळी विदर्भ क्रिकेट असोसिएशनकडूनही या मुलींचे कौतुक करण्यात आले. या मुलींचा खेळ बघून अनेकांना भविष्यातील मास्टर ब्लास्टर आणि स्मृती मानधना येथेच घडणार, असा विश्वास वाटतो.
आम्हाला क्रिकेट खेळायला आवडते. प्रशिक्षक आम्हाला खूप छान शिकवित आहेत. जपानी भाषादेखील शाळेत शिकायला मिळत आहे. आई-वडिलांसह परिसराचे नाव उंचावण्याची इच्छा आहे-क्रिकेटपटू जानवी उईक
जिद्द, चिकाटी आणि निडर- या संघातील सर्व खेळाडू या आदिवासी समाजामधून येत असल्यानं त्याची शरीरयष्टी मजबूत आहे. त्या कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीत स्वतःला सिद्ध करतात. त्यांच्यात असलेली उर्जा, जिद्द, चिकाटी आणि निडरपणा त्यांना इतरांपेक्षा वेगळे करते. आदिवासी मुली इतर मुलींच्या तुलनेत अधिक बलवान आहेत. त्याचाच फायदा क्रीडा क्षेत्राला होऊ शकतो.
मुलींची खूप मेहनत करण्याची यांची इच्छा असते. त्यामुळे मुली खूप प्रगती करणार आहेत. त्या नवनवीन शिकण्यासाठी अत्यंत उत्सुक असतात. या मुलींना कोणत्याही प्रेरणेची गरजदेखील लागत नाही. त्यांच्यासाठी चेंडू आणि बॅट हीच महत्त्वाची गोष्ट आहे- क्रीडा प्रशिक्षक स्वरुप शुक्ला
या निमित्तानं 'झुंड'ची आठवण :- काही वर्षांपूर्वी नागपूरात चित्रित झालेला 'झुंड' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. त्या चित्रपटात नागपूरचे फुटबॉल प्रशिक्षक विजय बारसे यांची व्यक्तिरेखा अमिताभ बच्चन यांनी साकारली होती. व्यसनांच्या आहारी गेलेल्या तरुणांना विजय बारसे यांनी फुटबॉलची गोडी लावून त्यांच्या जीवनात नवीन पहाट आणली होती. त्याप्रमाणे समाजसेवक खुशाल ढोक हेदेखील या मुलींच्या जीवनाचे शिल्पकार झाले आहेत.
हेही वाचा-