सातारा Shiv Sanman Award : साताऱ्याचे राजघराणे आणि शिवभक्तांच्यावतीनं यंदापासून 'शिवसन्मान पुरस्कार' देण्यात येणार आहे. यंदाचा पहिला पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाहीर झाला आहे. शिवजयंतीदिनी (दि. १९ फेब्रुवारी) समारंभ पूर्वक हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती खासदार उदयनराजे भोसले यांनी दिली आहे.
शिवजयंतीला पंतप्रधान साताऱ्यात :साताऱ्याच्या राजगादीला मोठा मान आहे. खासदार उदयनराजे भोसले हे छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट तेरावे वंशज आहेत. साताऱ्याचे राजघराणे आणि तमाम शिवभक्तांच्यावतीनं यंदापासून 'शिवसन्मान पुरस्कार' देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पहिला पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाहीर झाला आहे. दिनांक १९ फेब्रुवारी रोजी साताऱ्यातील सैनिक स्कूलच्या मैदानावरील समारंभात पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.
कार्यक्रमाचं नियोजन सुरू :पुरस्कार वितरण सोहळा सैनिक स्कूलच्या मैदानावर होणार आहे. यानिमित्त बुधवारी खासदार उदयनराजे भोसले यांनी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या समवेत पाहणी केली. यावेळी सैनिक स्कूलचे प्राचार्य, अधीक्षक, नगरपालिकेचे मुख्याधिकारी अभिजीत बापट, सुनील काटकर, काका धुमाळ, पंकज चव्हाण, मनोज शेंडे, विनीत पाटील उपस्थित होते.
स्व. लक्ष्मणराव इनामदार सिंचन योजनेला भेट :सातारा दौऱ्यावर आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्व. लक्ष्मणराव इनामदार जलसिंचन योजनेला भेट देणार आहेत. माण-खटाव तालुक्याची रक्तवाहिनी असणाऱ्या जिहे-कठापूर उपसा सिंचन योजनेचं 'गुरूवर्य स्व. लक्ष्मणराव इनामदार जलसिंचन योजना' असं नामकरण झालं आहे. लक्ष्मणराव इनामदार हे खटावचे सुपुत्र आणि पंतप्रधान मोदींचे गुरूवर्य होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ख्याती देश-विदेशात आहे. यापूर्वीही त्यांना देश-विदेशातील अनेक पुरस्कार मिळाले आहेत. यापूर्वी महाराष्ट्रातील टिळक पुरस्कारही पंतप्रधानांना मागील वर्षी देण्यात आला होता.
हेही वाचा:
- रेशनकार्ड धारकांना मोफत साडी देणं म्हणजे निवडणुकीचा स्टंट; विरोधकांचा आरोप
- केंद्रानं अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रासंदर्भात धोरणात्मक बदल करावे - अॅड. वामनराव चटप
- मध्य प्रदेश सरकारच्या धर्तीवर राज्य सरकारची महिलांना खैरात; 25 लाख महिलांना करणार साडी वाटप