महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बँक मॅनेजरची नोकरी सोडून हाती घेतलं 'एसटी'चं स्टेअररिंग; प्रवासी काढतात सेल्फी, फोटो

आतापर्यंत 'लालपरी'चं स्टेअरिंग हे पुरुषांच्या हातात होतं. आता महिलांनी देखील हे 'स्टेअरिंग' हातात घेतलंय. राज्यातील पहिली महिला एसटी चालकाची सक्सेस स्टोरी जाणून घेणार आहोत.

FIRST WOMAN ST DRIVER
पहिली महिला एसटी बस चालक (Source - ETV Bharat Reporter)

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 7, 2024, 8:03 PM IST

पुणे : देशभरात सध्या नवरात्र उत्सव साजरा केला जातोय. या नऊ दिवसात देवीचा जागर केला जातो. नवरात्र उत्सवात आपण देशभरातील अनेक महिलांचं कर्तुत्व, त्यांनी केलेलं काम तसंच त्यांनी दिलेलं योगदान याबाबत बोलत असतो. 'नवदुर्गा' म्हणत आपण महिलांचा सन्मान करतो. नवरात्रीनिमित्तानं आज आपण अशाच पुण्यातील 'नवदुर्गे'बाबत जाणून घेणार आहोत, या महिलेनं खासगी बँकेत मॅनेजर पदाची नोकरी सोडून आपल्या लाडक्या 'लालपरी'च म्हणजेच 'एसटी'मध्ये राज्यातील पहिली महिला बस चालक म्हणून मान मिळवलाय. राज्यातील पहिली महिला एसटी बस चालक ही अनेक प्रवाशांना घेऊन 'लालपरी' चालवत आहे.

पहिली महिला एसटी बस चालक :'लालपरी'च्या 72 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच महिला चालकानं बसचं स्टेअरिंग हाती घेतलंय. पुण्यातील शीतल शिंदे हिनं पहिली महिला एसटी बस चालक म्हणून मान मिळवलाय. दोन वर्षापूर्वी पुणे विभागात 17 महिलांचं प्रशिक्षण सुरू झालं होतं. आत्ता या महिला राज्यातील विविध डेपोमध्ये सध्या चालक म्हणून काम करत आहेत. काळानुरूप एसटी महामंडळ आपल्या सेवेत बदल करत आहे. महामंडळाच्या ताफ्यात नवनवीन व अत्याधुनिक बस दाखल होत आहेत. आरामदायी प्रवासाची सेवा देण्याच्या दिशेनं देखील महामंडळाचं पाऊल पुढे पडत आहे. पूर्वी बसमध्ये चालक आणि वाहक दोघेही पुरुषच होते. मध्यंतरी महिलांना देखील वाहक म्हणून काम करण्याची संधी देण्यात आली. आत्ता तर चालकही महिला असून, पुण्यातील शीतल शिंदे हिनं पहिली महिला एसटी चालक म्हणून मान मिळवला आहे.

महिला एसटी बस चालक शीतल शिंदे यांनी 'ईटीव्ही भारत'शी साधला संवाद (Source - ETV Bharat Reporter)

बँकेतील नोकरी सोडली :"2014 मध्ये मी एका खासगी बँकेत मॅनेजर म्हणून चार वर्ष काम केलं. लहानपणापासूनच लालपरीबाबत आकर्षण होतं. आपल्याला लालपरी चालवायची आहे हे स्वप्न मी पाहत होते. जेव्हा 2019 मध्ये महिला चालक म्हणून जाहिरात निघाली तेव्हा तर मी बँकेतील नोकरी सोडून दिली आणि महिला चालक व्हायचं ठरवलं. त्यानंतर दोन वर्ष प्रशिक्षण पूर्ण करून मी आज सोलापूर डेपो येथे चालक म्हणून एसटी चालवत असल्यानं मला खूपच आनंद होत आहे," अशा भावना शीतल शिंदे हिनं व्यक्त केल्या.

गाडी सुरू करायला भीती वाटत होती : "आमच्या घरी चारचाकी असताना देखील मी कधीही ती चालवली नाही. थेट पहिल्यांदा मी एसटीचं स्टेअरिंग हातात घेतलं. मला सुरुवातीला गाडी सुरू करायला देखील भीती वाटत होती. पण जेव्हा चालवायला सुरुवात केली तेव्हा खूपच चांगलं वाटत होतं," असं यावेळी शीतल शिंदेनं सांगितलं.

सोलापूर डेपोत रुजू : "मी सध्या सोलापूर डेपो येथे काम करत आहे. माझ्यासाठी पहिला दिवस हा खूपच अविस्मरणीय होता. पहिला प्रवास हा सोलापूर ते नळदुर्ग असा होता. जेव्हा एसटी चालवायला लागली तेव्हा खूपच आनंद वाटत होता. मनात थोडीशी चिंता होती. पण माझ्या गाडीत बसलेले जे प्रवासी होते, ते देखील खूप कौतुक करत होते. त्यांच्याकडून मिळणारा उत्साह हा खूपच भारी होता. मी सध्या सोलापूर ते नळदुर्ग, पंढरपूर, धाराशिव, तुळजापूर या मार्गावर एसटी चालवते. गाडीत बसणाऱ्या प्रवाशांना देखील चांगलं वाटतं की, एक महिला बस चालवत आहे. जेव्हा मी बस चालवत एखाद्या स्टॉपवर थांबते तेव्हा अनेक प्रवासी हे सेल्फी, फोटो काढण्यासाठी येत असतात आणि याचा मला खूपच अभिमान वाटत आहे," असं म्हणत शीतल शिंदे हिनं आनंद व्यक्त केला.

लहानपणीचं स्वप्न झालं पूर्ण : बँकेची नोकरी का सोडली? याबाबत विचारलं असता शीतल म्हणाली की, "मी माझ्या आयुष्यात अनेक संकटं बघितली. अनेक संकटातून पुढं जात माझं शिक्षण पूर्ण केलं. शिक्षण झाल्यानंतर जेव्हा बँकेत नोकरी केली तेव्हा जे मी लहानपणापासून स्वप्न पाहत होते, त्यामुळं माझं मन बँक नोकरीत लागत नव्हतं. पण जेव्हा महामंडळात भरती निघाली तेव्हा मी अर्ज केला आणि सिलेक्शन होऊन आज प्रशिक्षण पूर्ण करून बस चालवत आहे."

महिलांनी पुढं आलं पाहिजे : "एक महिला म्हणून मला असं वाटतं की, आज प्रत्येक क्षेत्रात आपल्याला महिला पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करत असताना पाहायला मिळतात, मग एसटीचं स्टेअरिंग हातात घ्यायला का विचार करू नये आणि का महिलांनी पुढे येऊ नये! मी जर आज बँकेत काम करत असती तर कोणीच मला ओळखलं नसतं. मात्र, मला माझ्या या स्वप्नांनी एक ओळख निर्माण करून दिली. आज जिथे जाईल तिथे लोक मला पहिली महिला एसटी बस चालक म्हणून ओळखत आहेत," असं यावेळी शीतल म्हणाली.

कशी झाली निवड? : महिला चालकांची भरती करण्याची प्रक्रिया मार्च 2019 मध्ये सुरू झाली. आलेल्या अर्जाची छाननी केल्यानंतर यातील 194 महिलांची निवड करण्यात आली. त्यानुसार त्या त्या जिल्ह्यात या महिलांना 3 हजार किलोमीटरचं प्रशिक्षण देण्यात आलं. मध्यंतरी कोविडमध्ये काही वेळ हे प्रशिक्षण थांबलं होतं, पण हे प्रशिक्षण आता पूर्ण होऊन अनेक महिला चालक म्हणून रुजू झाल्या असल्याचं शीतल शिंदेंना सांगितलं.

हेही वाचा

  1. वडील करायचे शिकार अन् आई मागायची भीक; विपरीत परिस्थितीत शिक्षण घेऊन निकितानं मिळवली शासकीय नोकरी - Amravati Success Story
  2. 'लाडक्या बहिणीं'साठी गुड न्यूज; ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे तीन हजार रुपये 'इतक्या' दिवसांत जमा होणार - Ladki Bahin Yojana
  3. नागपूर भरोसा सेलची कामगिरी! 3391 जोडप्यांच्या नात्यात निर्माण केला 'भरोसा' - Nagpur Police Bharosa Cell

ABOUT THE AUTHOR

...view details