शिर्डी (अहिल्यानगर)देशभरात महाशिवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येतोय. साईंच्या शिर्डीमध्येही ( Shirdi sai temple News ) महाशिवरात्री निमित्तानं भाविकांनी साई दर्शनासाठी गर्दी केलीय. साई संस्थान मार्फत चालविल्या जात असलेल्या प्रसादालयात दिवसभरात सुमारे १० हजार किलोची साबुदाणा खिचडी प्रसाद स्वरुपात दिली जातेय.
महाशिवरात्री निमित्तानं देशभरातून हजारो भाविक साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत आलेत. साईबाबा मंदिरात आणि द्वारकामाईत फुलांची सजावट करण्यात आलीय. महाशिवरात्री असल्यानं साईबाबांच्या समाधीवर दिवसभर भोलेनाथ यांची प्रतिमा ठेवण्यात येणार आहे. भाविक भोलेनाथ यांच्या रुपात साईबाबांचे दर्शन घेत आहेत.
साईमंदिरात विशेष प्रसाद (Source- ETV Bharat)
महत्त्वाचे संक्षिप्त मुद्दे
महाशिवरात्रीनिमित्त साईमंदिरात विशेष साबुदाणा खिचडी
वर्षातून दोनवेळा अशा प्रसादाचं होतं वाटप
४० हजार भाविक प्रसाद घेणार असल्याचा अंदाज
भोलेनाथाच्या रुपात साईंचे आज भाविकांना दर्शन
प्रसाद तयार करण्याची तयारी (Source- ETV Bharat)
१० हजार किलोची साबुदाणा खिचडी-शिर्डीला येणाऱ्या भाविकांना महाशिवरात्री निमित्त असलेला उपवास लक्षात घेवून साई संस्थानच्या प्रसादालयात आज दिवसभर साबुदान्याची खिचडी आणि झिरक हाच प्रसाद भक्तांना दिला जातोय. साई संस्थांनच्या प्रसादालयात सकाळच्या सत्रात २,२०० किलो साबुदाना, १,६०० किलो शेंगदाणे, १,३०० किलो बटाटे आणि ५०० किलो तूप वापरुन खिचडी आणि झिरक्याचा प्रसाद बनवण्यात आलाय. दिवसभरात भाविकांसह पंचक्रोशीतील नागरिक साई प्रसादलयात खिचडीचा प्रसाद घेण्यासाठी येणार असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे साधारणतः १० हजार किलोची साबुदाणा खिचडी आणि झिरके बनवण्यात येणार असल्याची माहिती साई संस्थांच्या वतीनं देण्यात आलीय.
सुमारे ४० हजार भाविकांना मिळणार विशेष साई खिचडी-श्रद्धा आणि सबुरीचा महामंत्र देणाऱ्या साईबाबांच्या दर्शनासाठी दररोज हजारो भाविक शिर्डीत येतात. यातील बहुतांश भाविक साई संस्थानच्या प्रसादालयात प्रसाद ग्रहण करतात. नियमितपणे चपाती, दोन भाज्या, वरण आणि भात असा प्रसाद संस्थांच्या वतीने देण्यात येतो. आषाढी एकादशी आणि महाशिवरात्रीच्या दिवशी भाविकांना उपवास असल्यानं भाविकांसाठी साई संस्थानकडून विशेष व्यवस्था करण्यात येते. या दिवशी भाविकांना साबुदाणा खिचडी आणि झिरका यांचा प्रसाद दिला जातो. सुमारे ४० हजार भाविक या विशेष साई खिचडीचा लाभ घेणार असल्याची माहिती साई प्रसादालयाचे प्रमुख संजय शिंदे यांनी दिली.