शिर्डी :मंगळवारी (10 डिसेंबर) मध्यरात्री गस्त घालत असताना शिर्डी पोलिसांनी 14 लाखांचा गांजा सदृश्य पदार्थ, 12 लाखांची चारचाकी गाडी आणि मोबाईल असा एकूण 26 लाख 53 हजार रुपयांचा माल जप्त करत गांजा सदृष्य पदार्थाची वाहतूक करणाऱ्या व्यक्तीला ताब्यात घेऊन मोठी कारवाई केली आहे.
26 लाख 53 हजार 405 रुपयाचा मुद्देमाल जप्त :उपविभागीय अधिकारी शिरीष वमणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार, सहाय्यक पोलीस निरीक्षक रामेश्वर कायंदे आणि पोलीस पथकानं ही कारवाई केली. रात्री साडेबाराच्या सुमारास राहाता तालुक्यातील नगर मनमाड रोडवर असलेल्या सावळीविहीर फाटा या ठिकाणी एक ग्रे रंगाची इनोव्हा कार समृद्धी महामार्गावरून उतरुन कोपरगावच्या दिशेनं शिर्डीकडे येत असताना या कारची तपासणी करण्यात आली. कारच्या डिक्कीची तपासणी केली असता त्यात 46 पाकिटात अंदाजे 96 किलो वजनाचा गांजा सदृश्य पदार्थ मिळून आला. सदर गांजा सदृश्य पदार्थाची किंमत अंदाजे 14 लाख 43 हजार असून कारची किंमत अंदाजे 12 लाख रुपये, 10 हजार रुपये किमतीचा एक मोबाईल असा एकूण 26 लाख 53 हजार 405 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती शिर्डी विभागाचे उपविभागीय अधिकारी शिरीष वमणे यांनी दिली.