मुंबई -Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत मोठे विधान केले आहे. शरद पवार कधी काय विधान करतील त्याचा अर्थ काय काढायचा, याचा अंदाज मोठमोठ्या राजकीय विश्लेषकांना देखील लावता येतं नाही. येणाऱ्या काळात अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतात, असा अंदाज शरद पवार यांनी वर्तवल्याने देशासह महाराष्ट्रातील राजकारात खळबळ उडाली आहे.
शरद पवार यांचे विधान....
एका राष्ट्रीय दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत शरद पवार यांनी म्हटलं आहे की, 2024 च्या निवडणुकीनंतर देशातील अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेस बरोबर जातील किंवा त्यातील काही पक्ष काँग्रेस पक्षात विलीन होतील. आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विलीनीकरणाबाबत पवार म्हणाले की आम्ही आणि काँग्रेस पक्षात काहीच फरक नसून वैचारिकदृष्ट्या आमची विचारसरणी गांधी, नेहरू यांची आहे. मात्र याबाबत आता बोलणे योग्य नसून सहकाऱ्यांचा सल्ला घेऊनच कोणताही निर्णय सामूहिकपणे घेतला जाईल. यामुळे राजकीय चर्चाना उधाण आले आहे. उद्धव ठाकरेदेखील समविचारी पक्षाबरोबर एकत्र काम करण्यास सकारात्मक असल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे. या विधानामुळे उद्धव ठाकरे यांची राजकीय अडचण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
शरद पवारांना लागलाय भविष्याचा वेध
शरद पवार यांनी भविष्यकाळात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यांनी आपलं वय लक्षात घेता आपल्या पक्षाचा भव्यतव्य काय ही चिंता त्यांना वाटणे स्वाभाविक आहे. देशासह राज्यातील काही टप्प्यातील निवडणुका होणे बाकी असतांना आशा प्रकारचं विधान करणे आश्चर्यजनक आहे, कारण शरद पवार नेहमी सावधपणे बोलत असतात, असं मत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक हेमंत देसाई यांनी व्यक्त केलं आहे. काही वर्षांपूर्वी काँग्रेसचे दिग्विजयसिंग आणि तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी देखील शरद पवार यांनी पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करावा अशी इच्छा व्यक्त केली होती. मात्र त्यावेळेस शरद पवारांनी त्यास ठाम विरोध केला होता. कारण त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच स्वतःच अस्तित्व होतं. पक्ष एकसंघ असल्यामुळे पक्षावर आपलं नियंत्रण राहू शकतं, पक्षात फूट पडेल असं त्यांना वाटलं नव्हतं. पक्षात फूट पडल्यानंतर पक्षाची पुनर्बांधणी आणि पक्ष नवीन टीमच्या हाती देण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. एका सभेतून त्यांनी पक्षात नवीन पिढी तयार होत नाही, तोपर्यंत आपला श्वास सुरु राहील असें म्हटल्या नंतर रोहित पवार यांच्या डोळ्यातून पाणी आले होते.
असं वक्तव्य करायला नको होत...
भविष्याचा विचार केला तर काँग्रेस आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची विचारसरणी एक असताना स्वतंत्र अस्तित्व का ठेवायचा अशा प्रकारचा प्रश्न माझ्यासारख्या अनेक राजकीय विश्लेषकांनी यापूर्वी केला होता. मात्र आता देशातील परिस्थिती बदलली असून भाजपाला तोडीस तोड उत्तर द्यायचं असेल तर फार मोठं बळ लागेल. त्यासाठी एकीचे बळ जास्त होतं, हे लक्षात घेऊन शरद पवारांनी अशा प्रकारचे विचार व्यक्त केले असावे, असं हेमंत देसाई सांगतात. शरद पवारांची वक्तव्य, भूमिका नेहमी बदलत असतात, अशा प्रकारचा आरोप अनेक जण करत असतात, मात्र काळानुसार भूमिका बदलाव्या लागतात. निवडणुका पूर्वी जर अशा प्रकारचे विधान केलं असतं तर त्यांच्या पक्षातील कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांचे खच्चीकरण झाले असते. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर प्रत्यक्षात काय होईल हे बघावे लागणार आहे. आज जरी त्यांनी हे वक्तव्य केलं असेल तर निकालानंतर त्यांच्या पक्षाला चांगले यश मिळाले तर त्यांची भूमिका काय असेल हे देखील पहावे लागेल. विलीनीकरण करायचं की नाही हे त्यांनी ठरवून चालणार नाही, कारण त्यांचे वय झाले आहे हे वास्तव आहे. त्यांच्या पक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते आणि टीमला काय तो विचार करावा लागेल, असं हेमंत देसाई सांगतात. आताच्या घडीला निवडणुकीच्या काळात अशा प्रकारचे विधान शरद पवारांनी केलं नसतं तर बरं झालं असतं, असंही हेमंत देसाई म्हणाले. आतापासून काँग्रेसकडे जाण्याच्या विचारमुळे पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आणि खच्चीकरण होईल आणि ते वेगळी वाट धरण्याची शक्यता नाकारता येतं नाही.
उद्धव ठाकरे आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करणार नाहीत
शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आपला पक्ष काँग्रेस पक्षात कधी विलीन करणार नाहीत, असं स्पष्ट मत राजकीय विश्लेषक हेमंत देसाई यांनी व्यक्त केलं आहे. ते सकारात्मक आहे कोणत्या मुद्द्यावर म्हटले की आपल्याला माहित नसल्याचं ते म्हणाले. खरी शिवसेना कोणाची हा संघर्ष सुरू असताना ते काँग्रेसमध्ये विलीन होतील, अशी शक्यता अजिबात वाटत नाही. तसं जर त्यांनी केलं तर भाजपाने केलेल्या टीकेप्रमाणे उद्धव ठाकरे यांनी आपली गाय काँग्रेसच्या गोठात बांधलेल्या टीकेला अर्थ प्राप्त होईल.