कोल्हापूर : ३० सप्टेंबर १९९३ ची पहाट महाराष्ट्रासाठी काळरात्र ठरली होती. पहाटे लातूर जिल्ह्यातील किल्लारी या ठिकाणी झालेल्या भूकंपानं लातूरसह देशाला मोठा धक्का बसला होता. मुख्यमंत्री म्हणून अवघ्या दोन तासात मी घटनास्थळी पोहोचलो. तोपर्यंत भूकंपाची बातमी वाऱ्यासारखी देशभर पसरली होती. तत्कालीन पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांनी मीही घटनास्थळाची पाहणी करण्यासाठी येत असल्याचा फोन केला. मात्र, मी त्यांना स्पष्ट शब्दात तुम्ही न येण्याची विनंती केली. पंतप्रधान घटनास्थळावर आल्यानंतर मदत कार्याला याचा अडथळा ठरेल. हे त्यांना पटवून दिलं, भारताच्या इतिहासात पंतप्रधानांना आपल्या राज्यात येऊ नका, असं एक मुख्यमंत्री पंतप्रधानांना सांगत होता. अशी आठवण राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी सांगितली. गुजरात, लातूर आणि १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटात आपत्ती काळात केलेल्या कार्याबद्दल कोल्हापुरातील व्हाईट आर्मी संस्थेकडून 'आपत्ती काळातील महायोद्धा पुरस्कारा'नं खासदार शरद पवार यांना सन्मानित करण्यात आलं यावेळी ते बोलत होते.
विरोधक असूनही आपत्ती हाताळण्यासाठी माझ्यावर जबादारी :यावर्षी गुजरात मधल्या भुजला भूकंप झाला. त्यावेळी सर्व पक्षांना एकत्र घेत तत्कालिन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी बैठक घेतली होती. कुठेही संकट आलं. त्यामध्ये महापूर, आपत्ती, काहीही असो त्यासाठी काही यंत्रणा हाताळण्यासाठी आवश्यकता असते. मला लातूरमध्ये झालेल्या भूकंपाची आपत्ती हाताळण्याचा अनुभव असल्याने विरोधी पक्षात असूनही पंतप्रधान वाजपेयी यांनी ही जबाबदारी माझ्यावर दिली होती. ही जबाबदारी यशस्वीपणे पूर्ण करू शकलो याचा आनंद आहे. देशात येणाऱ्या नैसर्गिक आपत्तीवर कायमस्वरूपी उपाय म्हणून राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा करण्यात आला. याचाच मतदारसंघ म्हणून आता देशात येणाऱ्या आपत्तीमध्ये शासकीय यंत्रणा आता उत्कृष्ठ काम करत आहेत. त्यांना पाठबळ देण्याची आवश्यकता असल्याचं यावेळी खासदार शरद पवार म्हणाले.