मुंबई Lok Sabha Election Result 2024 : लोकसभा निवडणूक निकाल 2024 मध्ये महायुतीला केवळ 18 जागा मिळाल्या. तर महाविकास आघाडीनं तब्बल 29 जागांवर मुसंडी मारली. देशातही 'इंडिया' आघाडीला मोठं यश मिळाल्यानं सरकार स्थापन करण्यास भाजपाला मोठी कसरत करावी लागणार आहे. 2019 ला राज्यात सर्वात मोठा पक्ष असूनही भाजपाला केवळ शरद पवारांमुळे सत्ता स्थापन करता आली नाही. तशीच स्थिती आता उद्भवण्याची शक्यता निर्माण झाली. इंडिया आघाडीच्या नेत्यांनी मित्रपक्षांना गळ घालण्याची जबाबदारी शरद पवार यांच्यावर टाकली. त्यामुळे केंद्रात आणि राज्यात नेहमीच प्रभावी आणि बेभरोशी धक्कातंत्राचं राजकारण करणारे शरद पवार हे यावेळी किंगमेकर ठरणार का, याकडं नागरिकांचं लक्ष लागलं आहे.
अनपेक्षित धक्कातंत्रासाठी ओळखले जातात शरद पवार :राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाचे अध्यक्ष शरद पवार राजकारणात आपल्या खेळीनं धक्का देतात. महाराष्ट्रात 2019 ला विधानसभेच्या निवडणुकीत भाजपा सर्वात मोठा पक्ष असल्यानं त्यांचं सरकार स्थापन होईल हे निश्चित झालं. मात्र शरद पवार यांनी काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादी तिघांना एकत्र करत महाविकास आघाडीची स्थापना करुन सरकार आणलं. महाविकास आघाडी सरकारनं करोना महामारीतही चांगलं काम केल्याचा दावा केला. काँग्रेस आणि शिवसेनेला एकत्र आणण्यात शरद पवार यांचा महत्त्वाचा वाटा आहे. राजकारणात शरद पवार आपल्या राजकीय खेळीमुळे कायम वरचढ ठरले आहेत.
पक्षासह घरात फूट पडल्यानंतर मिळवलं यश :महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भाजपानं फोडल्याचा आरोप महाविकास आघाडीकडून करण्यात आला. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर अजित पवार यांनी सत्ताधारी भाजपाला साथ दिली. यावेळी शरद पवारांसोबत सुप्रिया सुळे, श्रीनिवास पाटील, अमोल कोल्हे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, अनिल देशमुख आदी नेतेच उरले. मात्र तरीही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं 8 लोकसभा मतदार संघात विजय संपादन केला.