मुंबई Allotment of offices in Parliament :18 वी लोकसभा अस्तित्वात आल्यानंतर बुधवारी (11 सप्टेंबर) संसद भवनाकडून राजकीय पक्षांना कार्यालयाचं वाटप करण्यात आलं. विशेष म्हणजे लोकसभा सचिवालयाकडून देण्यात आलेल्या कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला 'राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष' या नावानं कार्यालय देण्यात आल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. तर दुसरीकडं शिंदेंच्या शिवसेनेचा उल्लेख 'शिवसेना शिंदे' असा केला गेल्यानं ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर खरा राष्ट्रवादी पक्ष आणि खरी शिवसेना कोणती यावरुन पुन्हा संभ्रम निर्माण करणारी परिस्थिती निर्माण झालीय. तर दुसरीकडं अजित पवार गटाला कार्यालयापासून वंचित ठेवण्यात आलंय.
दोन सेना तर दोन राष्ट्रवादी :राज्यातील सत्ता संघर्षात एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेत फूट पडली. त्यापाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही फूट पडली. यामुळं दोन ठाकरे गट आणि दोन राष्ट्रवादी काँग्रेस गट निर्माण झाले. यामध्ये खरी शिवसेना आणि खरी राष्ट्रवादी काँग्रेस कुठली? हा पेच आजही कायम असताना लोकसभा सचिवालयाकडून विविध राजकीय पक्षांना संसदेमध्ये कार्यालयाचे वाटप करण्यात आले. परंतु, यादरम्यान लोकसभा सचिवालयानं नावात घोळ करून सत्ता संघर्षातील हा पेच अजून वाढवलाय. राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाला दिलेल्या कार्यालयाचा उल्लेख 'राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष' तर शिवसेना शिंदे गटाला दिलेल्या कार्यालयाचा उल्लेख 'शिवसेना शिंदे' असा केला गेल्यानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह उपमुख्यमंत्री अजित पवार यांना घाम फुटलाय.
शरद पवारांना राष्ट्रवादी कॉंग्रेस नाव : लोकसभेत सचिवालयाच्या वतीनं पक्षांच्या संख्याबळानुसार त्यांना कार्यालयाचं वाटप केलं जातं. लोकसभेच्या नियमानुसार 8 पेक्षा जास्त खासदार असलेल्या पक्षाला संसद परिसरामध्ये कार्यालय दिलं जातं. लोकसभा निवडणुकीत अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचा 1 खासदार निवडून आला. शिवसेना शिंदे गटाचे 7 खासदार निवडून आले तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे 8 खासदार निवडून आलेत. अशा परिस्थितीत कार्यालयाच्या यादीमध्ये लोकसभा सचिवालयानं शरद पवार यांच्या पक्षाचा उल्लेख 'राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष' असा केलाय. वास्तविक पक्ष फूटीनंतर हे नाव अजित पवार यांना मिळालंय. तर शरद पवार यांना 'राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष' असं नाव मिळालंय.
शिवसेनेची दोन्ही दालन शेजारी-शेजारी : दुसरीकडं लोकसभा सचिवालयानं एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा उल्लेख 'शिंदे सेना' असा केलाय. तर उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला शिवसेना 'उद्धव बाळासाहेब ठाकरे' हे नाव देण्यात आलंय. यावरून शिंदे गटात मोठ्या प्रमाणात नाराजगी पाहायला मिळत आहे. तसंच उद्धव ठाकरे गटाला 128 ए क्रमांकाचं दालन देण्यात आलं असून शिंदे सेनेला 128 क्रमांकाचं दालन देण्यात आलंय. ही दोन्ही दालन शेजारी-शेजारी आहेत. तर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला 126 क्रमांकाचं दालन देण्यात आलंय. विशेष म्हणजे 1 खासदार असलेल्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला एकही दालन देण्यात आलेलं नाही. यंदा लोकसभा निवडणुकीत भाजपाला पूर्ण बहुमत मिळालं नसल्याकारणानं मित्र पक्षांच्या साहाय्यानं त्यांनी सरकार स्थापन केलंय. चंद्रबाबू नायडू यांच्या तेलगू देसम पक्षानं यात महत्त्वाची भूमिका निभावल्यानं टीडीपी हा पक्ष नव्या संसद भवनामध्ये कार्यालय मिळवणारा पहिला पक्ष ठरला असून बिहार मधील भाजपाचा मित्र पक्ष असलेल्या नितेश कुमार यांच्या पक्षाला सुद्धा कार्यालय देण्यात आलंय.
हेही वाचा -
- राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष कुणाचा? : NCP पक्ष आणि चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टात सुनावणी - NCP party and symbol Hearing