नाशिक Lok Sabha Election 2024 : देशभरात लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी आज (20 मे) मतदान प्रक्रिया पार पडत आहे. यामध्ये महाराष्ट्रातील 13 मतदारसंघांचा समावेश आहे. नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघात आज सकाळपासूनच मतदानाला सुरळीतपणे सुरुवात झाली. नाशिक लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराज यांनी आज पहाटे त्रंबकेश्वरच्या मंदिरात पूजा विधी करत अभिषेक केला. मंदिरातील दर्शन झाल्यानंतर सात वाजता त्यांनी त्र्यंबकेश्वर येथील मतदान केंद्रावर आपला मतदानाचा हक्क बजावला. मतदान झाल्यावर स्वामी शांतिगिरी महाराजांनी ईव्हीएम मशीनला आपल्या गळ्यातील हार घातला.
योग्य उमेदवाराला मतदान करा :शांतिगिरी महाराज म्हणाले, "लोकशाही मजबूत करण्यासाठी सर्वांनी आपल्या मतदानाचा हक्क बजवावा. जिल्ह्यात सर्वाधिक मतदान करून आपण एक आदर्श निर्माण करू. आपल्या हृदयातील भगवंताला विचारावं की मतदान कोणाला करावं? आपण आपला मतदानाचा हक्क बजावावा," असं माध्यमांशी संवाद साधत असताना महाराज म्हणाले.
नाशिकमध्ये तिरंगी लढत : नाशिक लोकसभा मतदारसंघात 31 उमेदवार आपलं नशीब आजमावत आहेत. मात्र, असं असलं तरी मुख्य तिरंगी लढत या मतदारसंघात बघायला मिळणार आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे, महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे आणि अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराज यांच्यात प्रमुख लढत असणार आहे. तर दिंडोरी लोकसभा मतदारसंघात दहा उमेदवार आपलं नशीब आजमावत आहेत. महायुतीच्या उमेदवार डॉ. भारती पवार आणि महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरे यांच्यात प्रमुख लढत असणार आहे.