मुंबईShambhuraj Desai: लोकसभा निवडणूक जागावाटपावरून महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात अजूनही निर्णय आणि शिक्कामोर्तब होत आहे. बुधवारी भाजपाने उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केल्यानंतर आज (14 फेब्रुवारी) शिवसेना (शिंदे गट) नेते आणि राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी जागावाटप यावर मोठं वक्तव्य केलं आहे. दरम्यान, राज्य उत्पादन शुल्क विभागातील प्रशिक्षण केंद्राला राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे हे पहिले प्रशिक्षण केंद्र असणार आहे. मागील वर्षी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून 21,000 कोटीचा महसूल जमा करण्यात आला होता. यावर्षी 24,000 कोटीचे आमचे लक्ष्य असल्याचं राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितलं आहे. त्यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते.
महायुतीचा एकच फॉर्मुला:लोकसभा जागावाटपाबाबत महायुतीमध्ये रस्सीखेच सुरू आहे का? जागावाटपाचा अजून निर्णय होत नाही, असा प्रश्न शंभुराज देसाईंना विचारला असता, महायुतीमध्ये जागा वाटपावरून कुठेही रस्सीखेच नाहीय. महायुतीचा एकच फॉर्मुला आहे. राज्यात 40 प्लसच्यावर खासदार आणायचे आहेत. आमचं आधीपासून एकच म्हणणं आहे 2019 मध्ये आम्ही जेवढ्या जागा लढवल्या होत्या, त्या जागा आम्हाला मिळाल्या पाहिजेत. यावर आम्ही ठाम आहोत. बुधवारी भाजपाने दुसरी यादी जाहीर केली. महाराष्ट्रातून 20 उमेदवारांची नावे जाहीर झाली आहेत. त्याच्यामध्ये आम्ही मागील वेळी जिथे उमेदवार दिला होता. त्या जागेवर कुठेही भाजपाने उमेदवार जाहीर केलेला नाही. त्यामुळे तिन्ही पक्षाचे नेते जागा वाटपाचा तिढा लवकरच सोडवतील. यातून योग्य तो मार्ग निघेल; परंतु आमच्यात कुठेही समन्वय नाही, असे नाही. तिन्ही पक्षांना योग्य त्या जागा मिळतील, असेही शंभूराज देसाई यांनी यावेळी सांगितले.
राज्यात पहिले प्रशिक्षण केंद्र :राज्य उत्पादन शुल्क विभागात जे काही गुन्हे घडतात त्याची पडताळणी करण्यासाठी पोलीस प्रशिक्षण केंद्रात आम्हाला जावे लागत असे. तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागातील अधिकारी आणि कर्मचारी यांना प्रशिक्षणासाठी पोलीस प्रशिक्षण केंद्र पुणे किंवा नाशिक या ठिकाणी जावे लागत असे; परंतु आता राज्य उत्पादन शुल्क विभागाचे स्वतंत्रपणे प्रशिक्षण केंद्र झाल्यानंतर आम्हाला येथे प्रशिक्षण घेता येणार आहे. काही महिन्यांपूर्वी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे स्वतंत्र प्रशिक्षण केंद्र असावे असा प्रस्ताव आम्ही मुख्यमंत्र्यांकडे ठेवला होता. मुख्यमंत्र्यांनी ह्याला लगेच होकार दिल्यामुळे राज्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पहिले प्रशिक्षण केंद्र उभे राहत आहे. या प्रशिक्षण केंद्रासाठी 348 कोटी रुपये खर्च येणार असून, 50 एकरमध्ये मोठे हे प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येणार आहे, असं मंत्री शंभूराजे यांनी सांगितले.