मुंबई - निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची घोषणा कधीही होऊ शकते. या अनुषंगाने महायुतीची संयुक्त पत्रकार परिषद मुंबईत आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी महायुतीच्या नेत्यांकडून महाविकास आघाडी आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करण्यात आलीय. महायुतीच्या संयुक्त पत्रकार परिषदेनंतर महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद आता 11 ऑक्टोबरला मुंबईत होणार आहे.
महायुतीमध्ये पूर्णतः समन्वय :हरियाणा आणि जम्मू-काश्मीरच्या निकालानंतर महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगाकडून कुठल्याही क्षणी केली जाऊ शकते. याच अनुषंगाने हरियाणातील विजयाने भाजपाचं आणि राज्यात महायुतीचं मनोबल उंचावलं असल्याकारणाने विधानसभा निवडणुकीसाठी महायुती पूर्णपणे सज्ज झाली असून, याबाबत सविस्तर माहिती देण्यासाठी महायुतीकडून मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आलं होतं. याप्रसंगी बोलताना शिवसेनेचे शिंदे गटाचे नेते आणि मंत्री शंभूराजे देसाई म्हणाले की, निवडणुका कधीही घोषित होऊ शकतात. याबाबत महायुतीच्या अनेक बैठका झाल्या. आम्ही 288 मतदारसंघांत निवडणूक समन्वयकांच्या नियुक्त्या केल्यात. महायुतीत पूर्णतः समन्वय आहे. जागा कुणाला किती याबाबत काही मतभेद नाहीत. प्रत्येक पक्षातील प्रमुख नेते याबाबत निर्णय घेतील. त्याची अंमलबजावणी करणे ही जबाबदारी प्रत्येक पक्षाने आमदार, खासदार आणि समन्वयक यांना देण्यात आली आहे. आम्ही पूर्ण ताकतीने मैदानात उतरणार आहोत. उमेदवारी जाहीर झाल्यावर बंडखोरी होणार नाही, याकडे बारकाईने लक्ष ठेवू. तसा प्लान आमच्याकडे तयार आहे. लोकसभेत फेक नरेटिव्हचा फटका आम्हाला बसला. पण आता तसे होणार नाही. जे विकासाचे काम मागच्या अडीच वर्षांत महायुतीने केलंय, त्या कामाच्या जोरावर आम्ही लोकांमध्ये जाणार आहोत. आम्ही टीकेकडे लक्ष देत नाहीत, तर कामाच्या कृतीमध्ये विश्वास ठेवतो. महायुती बहुमताच्या आकड्याच्या खूप पुढे जाईल, असंही शंभूराज देसाई म्हणालेत.