छत्रपती संभाजीनगर Biscuits poisoned students :छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यात बिस्किटातून विद्यार्थ्यांना विषबाधा झाली आहे. पैठण तालुक्यातील केकत जळगाव येथील जिल्हा परिषद शाळेत ही घटना घडलीय. यात 200 हून अधिक विद्यार्थ्यांना विषबाधा झालीय. या घटनेमुळं पालकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
पाचोड येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये विद्यार्थ्यांवर उपचार (ETV BHARAT Reporter) 200 हून अधिक विद्यार्थ्यांना विषबाधा :बिस्किटमधून शालेय विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना पैठण तालुक्यातील केकत जळगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये शनिवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास घडली. यात सुमारे 200 हून अधिक विद्यार्थ्यांना विषबाधा झाली. सर्व विद्यार्थ्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करत उपचार सुरू करण्यात आले.
बिस्किटांची तपासणी करण्याची मागणी :यावेळी सर्व विद्यार्थ्यांना रुग्णालयात चार तास निरीक्षणाखाली ठेवण्यात आलं होतं. सध्या विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असून, विद्यार्थ्यांना उपचार करून घरी सोडण्यात आलय. विषबाधा झालेले सर्व विद्यार्थी सातवीच्या वर्गातील आहेत. या विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या पोषण आहाराचा भाग म्हणून शनिवारी बिस्किटं देण्यात आली. ती खाल्ल्यानंतर विद्यार्थ्यांना उलट्या होऊ लागल्या, तर काहींना चक्कर येऊ लागली. शालेय पोषण आहारात दिल्या जाणाऱ्या बिस्किटांची अन्न आणि औषध प्रशासनाकडून सखोल चौकशी करण्याची मागणी विद्यार्थ्यांच्या पालकांनी केली आहे. वाटप करण्यात आलेल्या बिस्किटांची मुदत संपायला अजून दोन महिने बाकी होते. ती बिस्किटं आम्ही स्वतः खाल्ली आणि नंतर ती विद्यार्थ्यांना वाटली. विद्यार्थ्यांची प्रकृती अचानक कशी बिघडली हे आम्हालाही कळलं नाही, अशी माहिती प्राचार्य भागवत शिंदे यांनी दिली. त्याचबरोबर शाळेत वाटण्यात आलेल्या बिस्किटांचा नमुना घेऊन तपासणीसाठी पाठवू. त्यानंतर पुढील कारवाई केली जाईल, अशी माहिती शाळा समितीचं अध्यक्ष अशोक बढे यांनी दिली.
बिस्किट खाल्ल्यानंतर मळमळ : पैठण तालुक्यातील केकत जळगाव येथील जिल्हा परिषद शाळेत पहिली ते सातवीपर्यंत 296 विद्यार्थी शिक्षण घेतात. शनिवारी शाळेचा परिपाठ झाल्यानंतर बिस्किट वाटप करण्यात आलं होतं. बिस्किटं खाल्ल्यानंतर अर्ध्या तासानं विद्यार्थ्यांचं पोटात गडबड होत असल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी केली. काही जणांना मळमळ, उलट्या होऊन विद्यार्थांना ताप आल्याचं लक्षात आलं. त्यानंतर लगेच या सर्व विद्यार्थ्यांना पाचोडच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आलं. बिस्कीटातूनच विषबाधा झाल्याचं यावेळी उघड झालं. या सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात आलय. मात्र, शाळेत घटना घडल्यानं पालक संतप्त झाले आहेत. वाटप करण्यात आलेल्या बिस्कीटांची मुदत तपासली होती का? असा प्रश्न यावेळी पालकांनी उपस्थित केलाय. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. नोमान शेख, डॉ. बाबासाहेब घुगे, डॉ. प्रकाश साबळे, डॉ. आसाराम चौरे, डॉ. शिवाजी पवार, डॉ. संदीपान काळे, डॉ. अक्षय खरग, डॉ. राहुल दवणे यांनी तातडीनं विषबाधा झालेल्या विद्यार्थ्यांनी तपासणी करून त्यांच्या प्राथमिक उपचार केले.