सातारा : कराड तालुक्यातील इंदोली गावातील नागरी वस्तीत दुर्मिळ आणि वन्यजीव कायद्यांतर्गत शेड्यूल एकमध्ये संरक्षित असलेला अजगर (Indian Rock Python) आढळून आला. या अजगराची लांबी सात फूट आणि वजन साडे दहा किलो होते. हा भला मोठा अजगर पाहून नागरीकांना धडकी भरली.
अजगराला सोडलं नैसर्गिक अधिवासात : वन विभागात वनपाल असलेल्या संदीप कुंभार यांना त्यांच्या घराजवळ सायंकाळच्या सुमारास भला मोठा अजगर दिसला. त्यांनी सर्पमित्र अमोल पवार, रोहीत कुलकर्णी यांच्या मदतीने अजगराला रेस्क्यू केलं. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक किरण जगताप यांच्या मार्गर्शनाखाली वनक्षेत्रपाल संग्राम गोडसे, ललिता पाटील, मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे, वनपाल सागर कुंभार, वनरक्षक संतोष चाळके, अजय महाडीक, योगेश बडेकर यांनी अजगराला नैसर्गिक अधिवासात सोडलं.
वस्तीत आढळला सात फूट लांबीचा अजगर (ETV Bharat Reporter)
लांबी सात फूट, वजन साडे दहा किलो :नागरी वस्तीत आढळलेला अजगर हा दुर्मिळ आणि वन्यजीव कायद्याने शेड्यूल एकमध्ये संरक्षित आहे. या अजस्त्र अजगराची लांबी तब्बल सात फूट आणि वजन साडे दहा किलो होते. अजगर (रॉक पायथॉन) हा सर्वांत मोठा बिनविषारी सर्प आहे. सरीसृप वर्गातील बोइडी कुलातील पायथॉनिनी उपकुलात त्याचा समावेश होतो.
अजगरांची संख्या ३० टक्क्यांनी घटली : अधिवास नष्ट होणे आणि अपुऱ्या संवर्धनामुळं भारतीय अजगरांची संख्या सुमारे ३० टक्के घटल्याचं सर्वेक्षणात आढळून आलंय. त्यामुळं इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्वेशन ऑफ नेचर (IUCN) या संस्थेने नजीकच्या काळात अजगराची प्रजाती धोक्यात येऊ शकते, असं जाहीर केलंय.
हेही वाचा -
- Python Rescued Video : 14 फूट लांब, 74 किलो वजन; 'या' विशालकाय अजगराची वनविभागाने केली सुटका
- Smuggling Of Wild Animals : बँकॉकवरुन बंगळुरूत वन्यप्राण्यांची तस्करी; अजगर, दुर्मीळ कासव, कांगारूसह 234 वन्यप्राणी जप्त
- Python Swallow Goat : अजगराने बोकडाला गिळण्याचा केला पुरेपूर प्रयत्न, पण आले अपयश; पहा व्हिडिओ