सिंधुदुर्ग : भारत पाकिस्तान सामन्यानंतर देशविरोधी घोषणा देणाऱ्या भंगारवाल्या दाम्पत्याला प्रशासनानं चांगलीच अद्दल घडवली. या भंगारवाल्यानं भारत आणि पाकिस्तान सामन्यानंतर पाकिस्तानच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली. त्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली. परिसरातील नागरिकांनी या भंगारवाल्या व्यावसायिकाविरोधात संताप व्यक्त केला. आमदार निलेश राणे यांनी मालवण शहरातील आडवण इथल्या परप्रांतीय भंगार व्यावसायिकांची अनधिकृत बांधकाम प्रशासनानं जेसीबीनं जमीनदोस्त केलं. नागरिकांनीही त्याला उत्स्फूर्त पाठिंबा देत या कारवाईचं स्वागत केलं.
आमदार निलेश राणे यांनी केली कारवाईची मागणी :भंगारवाल्या व्यावसायिकानं पाकिस्तानच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली. त्यामुळे संतप्त नागरिकांनी आमदार निलेश राणे यांच्याकडं धाव घेत तक्रार केली. सोमवारी आमदार निलेश राणे यांनी प्रशासनाला पत्र पाठवून कारवाईची मागणी केली. या पत्राची दखल घेत नगरपरिषद हद्दीतील वायरी आडवण इथं परप्रांतीय भंगार व्यावसायिकांनी केलेलं अनधिकृतपणे अतिक्रमणावर प्रशासनानं कारवाई केली. प्रशासनानं हे अनधिकृत बांधकाम हटवत परिसर मोकळा केला. त्यामुळे प्रशासनानं अतिक्रमणावर केलेल्या या बुलडोझर कारवाईचं नागरिकांकडून स्वागत करण्यात येत आहे.