शिर्डी Collector High School : नावात काय आहे असं म्हणतात, अर्थात कर्तृत्ववानं मोठे झालेल्या माणसांचे आदर्श नव्यापिढी समोर असावेत. त्यातून प्रेरणा घेऊन इतरांनी त्याच वाटेवर पुढं जावं ही सर्वसाधारण अपेक्षा आणि उद्देश असतोच. अशाच एका उद्देशानं संगमनेर तालुक्यातील एका गावातील शाळेला चक्क "कलेक्टर हायस्कूल, चिखली" असं नाव दिलं गेलं आहे. अर्थात काहीसं वेगळं वाटणारं या विद्यालयाचं नाव असलं तरी, त्यामागंही एक प्रेरणादायी कहाणी आणि उद्देश आहे.
कलेक्टर हायस्कूल (ETV Bharat Reporter) गावात 1994 पासून आहे माध्यमिक शाळा :संगमनेर तालुक्यातील एक छोटेसं पण पुढारलेलं चिखली गाव. संगमनेर शहरापासून अवघ्या काही अंतरावर असलं तरी ग्रामीण वातावरण आहे. काही दशकांपूर्वी या गावात माध्यमिक शाळा नव्हती. प्राथमिक शिक्षणानंतर मुलांना इतर जवळच्या गावात पुढील शिक्षणाला जावं लागत होतं. मात्र 'गाव करी ते राव काय करील' या उक्ती प्रमाणं गाव एकवटलं आणि गावात 1994 नूतन माध्यमिक शाळा सुरू झाली.
प्रगतीच्या विचारानं शिक्षणाची धरली कास :विकास आणि प्रगतीच्या विचारानं शिक्षणाची कास धरलेल्या गावातील मुलंही हुशार होती. यातील निर्मलकुमार देशमुख यांनी याच शाळेत धडे गिरवत पुढं जिल्हाधिकारी अर्थात कलेक्टर पदावर मजल मारली. एका छोट्या गावातून पुढं कलेक्टर झालेले निर्मलकुमार देशमुख यांनी शाळेच्या अर्थात गावच्या ऋणातून उतराई होण्याचा संकल्प केला. त्यांनी विविध संस्थांची मदत घेत शाळेसाठी भव्य-दिव्य इमारत उभी करण्यासाठी मुंबई इथल्या ट्रस्टी श्री सौराष्ट्र दशश्रीमाली जैन भोजनालय, विविध फंड्स यांच्यासह गावकऱ्यांनीही मदत केली आहे.
शाळेतील विद्यार्थी झाला कलेक्टर :चिखली गावातील या शाळेतील निर्मलकुमार देशमुख हे विद्यार्थी कलेक्टर झाले. त्यांनीकेलेली मदत आणि गावातून पुढं आलेले मदतीचे शेकडो हात यातून शाळेची भव्यदिव्य नूतन वास्तू उभी राहिली. मग शाळेला नाव काय द्यायचं हा विषय येताच सर्वानुमते नवीन विद्यार्थ्यांसमोर एक आदर्श उभा रहावा, हा उद्देश समोर आला. यातून याच विद्यालयातून कलेक्टर झालेली व्यक्ती आणि त्यांनी गावाप्रती ठेवलेली जाणीव हा आदर्श विद्यार्थ्यांसमोर रहावा, म्हणून चक्क विद्यालयाचं नाव कलेक्टर हायस्कूल, चिखली असं ठेवलं.
विद्यार्थ्यांना प्रेरणा देत आहे कलेक्टर हायस्कूल :आज-काल गावागावात आणि तालुक्या-तालुक्यात सहकार महर्षी, शिक्षण महर्षी अशा नावानं एखाद्या व्यक्तीचं नाव संस्थेला दिलं जाते. मात्र यातून नेमकं त्या व्यक्तीचा आदर्श काय तो क्वचितच मुलांना समजतो वा समजवला जातो. अशी संस्थेची नावं केवळ नाममात्र राहून जातात. मात्र चिखलीच्या ग्रामस्थांनी कलेक्टर हायस्कूल नाव देत याच शाळेतून एक आदर्श विद्यार्थी निर्माण झाला. कलेक्टर झाला असा संदेश देण्यात येतोय. जो विद्यमान स्थितीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रेरणा देत दिशा देणारा असाच आहे.
हेही वाचा :
- "फुलांचा गुच्छ नको, विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य आणा"; अमरावतीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याचा पुढाकार - ZP School Students Melghat
- विठ्ठल नावाची शाळा भरली... डोळे दिपवून टाकणारा रंगला विद्यार्थ्यांचा रिंगण सोहळा, पाहा व्हिडिओ - Ashadi Ekadashi 2024
- दप्तराचं ओझं होणार कमी! नववीतील संदेशच्या 'डिजिटल स्मार्ट बॅग'ला मिळालं पेटंट, काय आहे खासियत? - patent for smart bag