चंद्रपूर : चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेसाठी होणारी पदभरतीत ही वादग्रस्त ठरली. कुठलेही आरक्षण न ठेवता ही भरती प्रक्रिया सुरू आहे. तसेच विद्यार्थ्यांनी देखील या प्रक्रियेवर आक्षेप नोंदवलाय. आता भाजपाचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी देखील या प्रक्रियेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. "या संपूर्ण प्रक्रियेत सामान्य विद्यार्थ्यांचे मोठे शोषण केले गेले आहे, तसंच आरक्षणाच्या एकाही अटीचे पालन न करता ही प्रक्रिया सुरू आहे, ही प्रक्रिया संशयास्पद आहे," असा गंभीर आरोप त्यांनी केलाय. ही भरती रद्द करण्यात यावी ही मागणी घेऊन विद्यार्थ्यांनी मोर्चा काढला. या मोर्चाला पाठिंबा देताना त्यांनी हे आरोप केले.
काय आहे नेमकं प्रकरण? : चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची पदभरती जाहीर करण्यात आली. 261 लिपिक आणि 97 पदे शिपाई पदाची भरली जाणार होती. मात्र, या प्रक्रियेच्या सुरुवातीपासून यावर प्रश्नचिन्ह उठायला सुरुवात झाली. या संपूर्ण प्रक्रियेत पारदर्शकता बाळगली गेली नाही, असे आरोप विद्यार्थ्यांकडून आणि सामाजिक संघटनांकडून केले जातायेत. विशेषतः मागासवर्ग, महिला वर्ग यासाठी आरक्षणाची कुठलीही अट यात ठेवली नसून, संपूर्ण भरती प्रक्रिया खुल्या पद्धतीनं घेतली जाते. 21 डिसेंबरला शिपाई पदासाठी परीक्षा ठेवण्यात आली होती. मात्र, तांत्रिक कारण देऊन ही परीक्षा अचानक रद्द करण्यात आली. 27 डिसेंबरला जी परीक्षा झाली त्यातले प्रश्न आणि उत्तराबाबत गंभीर प्रश्न विद्यार्थ्यांनी उपस्थित केले. याबाबत अनेक तक्रारी देखील झाल्या. मात्र, यावर पुढे काहीच झालं नाही.