मुंबई :राज्यातील महिलांसाठी महायुती सरकारनं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. मात्र, राज्याच्या अनेक भागात सरकारी कार्यालयांमध्ये योजनेचा फॉर्म भरण्यासाठी महिलांची गर्दी दिसून येत आहे. तसंच अनेक ठिकाणी अर्ज भरण्यासाठी आर्थिक लूट केली जात असल्याचं समोर येत आहे. या योजनेसाठी कोणतंही शुल्क आकारलं जाणार नाही, असं शासनाच्या वतीनं यापूर्वी सांगण्यात आलं आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबविण्यासाठी सातारा पॅटर्न राबविण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी आज दिलीय.
सातारा पॅटर्न राबवणार :"महिलांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा अर्ज करण्यासाठी कुठंही जाण्याची गरज नाही. ही योजना यशस्वीपणं राबवून महिलांचा त्रास कमी करण्यासाठी आम्ही सातारा पॅटर्न राबवू. या पॅटर्ननुसार आमची पथकं घरोघरी जातील. ते घरोघरी जाऊन शक्ती ॲपवर अर्ज भरणार आहेत. त्यासाठी पथकं तयार करण्यात आली आहेत. त्यामुळं महिलांना कुठंही जावं लागणार नाही, कुठंही अर्ज करण्याची गरज भासणार नाही", असं शंभूराज देसाई यांनी सांगितलं. सोमवारी ॲपचं लोकार्पण होणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.