महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुलाला वाचविण्याकरिता वडिलासह आजोबाची कालव्यात उडी; चिमुकल्याचा मृत्यू, वडील बेपत्ता

Dhom Balkawadi Canal : धरणाच्या कालव्यात पडलेल्या मुलाला वाचविण्यासाठी बापानं कालव्यात उडी मारली. मात्र, दोघेही पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याची घटना सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यात घडली आहे. या घटनेत चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे. वडिलांचा अद्याप शोध लागलेला नाही.

in satara father son drowned in dhom balkawadi canal son died and father missing
धोम बलकवडी कालव्याच्या प्रवाहात बापलेक वाहून गेले

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 11, 2024, 10:55 PM IST

सातारा Dhom Balkawadi Canal :खंडाळा तालुक्यात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. पाय घसरून धोम-बलकवडी धरणाच्या कालव्यात पडलेल्या चिमुकल्याला वाचविण्यासाठी बापानं कालव्यात उडी मारली. मात्र, दोघंही पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले. या घटनेत चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे. वडील बेपत्ता आहे. शंभूराज विक्रम पवार (वय 5 वर्षे), असं मृत चिमुकल्याचं नाव असून त्याचे वडील विक्रम मधुकर पवार (वय 32) यांचा अद्यापही शोध सुरू आहे.

धुणे धुवायला गेल्यानंतर घडली दुर्घटना : अजनुज (ता. खंडाळा) येथील मधुकर पवार, त्यांचा मुलगा विक्रम, सून आणि नातू शंभूराज हे धोम-बलकवडी कालव्यावर कपडे धुण्यासाठी गेले होते. यावेळी 5 वर्षीय शंभुराज हा पाय घसरून कालव्यात पडला. त्याला वाचवण्यासाठी त्याचे वडील विक्रम यांनी पाण्यात उडी घेतली. मात्र, त्यांनाही पोहता येत नव्हतं. त्यामुळं बाप-लेक पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले. हे बघून विक्रम यांचे वडील मधुकर पवार यांनीदेखील पाण्यात उडी घेतली. मात्र, पाण्याच्या प्रवाहामुळं ते वाहत जाऊ लागले.

सुनेनं सासऱ्यांना वाचवलं : या थरारक प्रसंगी मधुकर पवार यांच्या सुनेनं सासऱ्यांच्या दिशेनं साडी टाकली. साडीच्या साहाय्यानं त्यांना पाण्यातून बाहेर काढून वाचवलं. मात्र, पती विक्रम आणि मुलगा शंभुराज हे वाहून गेले. घटनास्थळापासून दीड किलोमीटर अंतरावर पाण्यातून वाहताना दिसलेल्या शंभूराजला शिरवळ रेस्क्यू टीमनं पाण्यात उड्या मारून बाहेर काढलं. त्यानंतर लगेल शंभुराजला उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आलं. मात्र, डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केलं.

रेस्क्यू टीमनं राबवली शोध मोहीम : शिरवळ रेस्क्यू टीम आणि शिरवळ पोलिसांनी विक्रम मधुकर पवार यांचा रात्री उशीरापर्यंत शोध घेतला. मात्र, ते सापडले नाहीत. अखेर अंधारामुळं शोध मोहीम थांबविण्यात आली. या घटनेची माहिती मिळताच खंडाळ्याचे तहसिलदार अजित पाटील, पोलीस निरिक्षक सुनिल शेळके, नायब तहसिलदार योगेश चंदनशिवे, मंडलाधिकारी संतोष नाबर यांनी घटनास्थळी भेट दिली. तसंच या घटनेची नोंद खंडाळा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

हेही वाचा -

  1. Rainfall In Amaravati : अमरावती जिल्ह्यात मुसळधार पाऊस; तीन जण वाहून गेल्याने खळबळ
  2. Thane Flood : रुळावरून चालताना चार महिन्यांचे बाळ पडले पुराच्या पाण्यात, अद्यापही बाळ बेपत्ताच
  3. Heavy Rain in Raver: रावेर तालुक्यात मुसळधार पाऊस; रावेरचे माजी उपनगराध्यक्ष सुधीर पाटील पुरात वाहून गेले

ABOUT THE AUTHOR

...view details