सातारा - कराडच्या विद्यानगरमध्ये अपार्टमेंटमधील दुचाकी पार्किंगच्या वादातून तरुणानं सोसायटी अध्यक्षाच्या घरात घुसून गोळीबार केल्याची खळबळजनक घटना शुक्रवारी (२७ डसेंबर) रात्री साडेनऊच्या सुमारास घडली. याप्रकरणी पोलिसांनी हल्लेखोर सुरेश काळे (मूळ रा. तळबीड, सध्या रा. सैदापूर) या संशयितास ताब्यात घेतले.
संशयितानं केलेल्या गोळीबारात गृहनिर्माण सोसायटीयचे अध्यक्ष प्रदीप घोलप आणि त्यांची दहा वर्षांची मुलगी श्राव्या जखमी झाली. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी संशयिताकडून गावठी पिस्तुलासह १६ जिवंत काडतुसं जप्त केली आहेत.
गोळीबारानं विद्यानगरी हादरली-सैदापूरमधील विद्यानगरमध्ये अनेक महाविद्यालयं, कोचिंग क्लासेस आहेत. मुलांचं शिक्षण तसंच नोकरीच्या निमित्तानं परगावचे लोक विद्यानगरीत वास्तव्यास आहेत. त्यामुळं विद्यानगर हे एज्युकेशन हब बनलं आहे. आजुबाजूच्या तालुक्यातील माजी सैनिकांनी या परिसरात स्थावर मिळकती घेतल्या आहेत. याच विद्यानगरीतील होली फॅमिली स्कूलच्या मागील ओम कॉलनीतील अक्षरा रेसिडेन्सीमध्ये शुक्रवारी रात्री गोळीबाराची घटना घडली.
पार्किंगच्या वादातून गोळीबार?-गोळीबारात जखमी झालेले प्रदीप घोलप हे गृहनिर्माण सोसायटीचे अध्यक्ष आणि माजी सैनिक आहेत. ते १२ वर्षांपासून विद्यानगरीत वास्तव्यास आहेत. संशयित हल्लेखोर सुरेश काळे हा त्याच सोसायटीत पहिल्या मजल्यावर पाच वर्षांपासून राहत आहे. शुक्रवारी रात्री साडेनऊच्या सुमारास सुरेश काळे सोसायटीत आला. त्यानं दुचाकी रस्त्यात आडवी लावली. दुचाकी बाजूला पार्क करा, असं सांगितल्यावरून घोलप आणि काळे यांच्यात वाद झाला. त्यानंतर अर्ध्या तासानं हल्लेखोर घोलप यांच्या घरी गेला. ते जेवत असतानाच त्यानं घरात घुसून थेट गोळीबार केल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
गोळीबारात बाप-लेक जखमी-गावठी पिस्तुलातून झाडलेली गोळी प्रदीप घोलप यांच्या गालाला चाटून गेली. तर दुसरी गोळी मुलीच्या दोन्ही हातांना लागली. घोलप कुटुंबीयांनी आरडाओरडा केल्यामुळं लोक गोळा झाले. त्यांनी पोलिसांना पाचारण केलं. पोलीस फौजफाटा दाखल झाल्यानंतर जखमींना रुग्णालयात नेण्यात आलं. हल्ल्यानंतर संशयित सुरेश काळे यानं स्वतःला आपल्या घरात कोंडून घेतलं होतं. पोलिसांनी त्याला दरवाजा उघडायला लावला. त्यावेळी त्यानं पोलिसांवरही हल्ल्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्याला शिताफीनं पकडलं.
- हल्ल्याचं नेमकं कारण काय?-पोलिसांना संशयिताच्या घरातील धान्याच्या बॅरेलखाली लपवून ठेवलेली पिस्तूल आणि १६ जिवंत काडतुसं सापडली. संशयित पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचं समजतंय. दरम्यान, या घटनेमागे पार्किंगचा वाद की अन्य कोणतं कारण आहे, हे तपासात उघड होईल.
हेही वाचा-
- महालक्ष्मी ज्वेलर्स गोळीबार प्रकरण; शहापूर बंदची हाक देत पोलीस ठाण्यावर व्यापाऱ्यांचा मूक मोर्चा
- ज्वेलर्स दुकानावरील गोळीबारात सेल्समनचा मृत्यू, चोरट्यांशी एकटीच लढली भाजी विक्रेता महिला