सातारा - शासकीय नोकरीच्या अमिषानं 90 लाख रुपये उकळून तरुणांची फसवणूक करणाऱ्या तोतया आयपीएस अधिकाऱ्याचं ( Fake IPS officer case) हैदराबाद कनेक्शन समोर आलं आहे. तोतया आयपीएस अधिकारी श्रीकांत विलास पवार (रा. श्रीपूर, ता. माळशिरस, जि. सोलापूर) याला बनावट आयकार्ड तयार करून देणाऱ्या संशयिताला हैदराबादमधील बहादूरपुरा परिसरातून अटक करण्यात आली आहे. आरोपी हा ई-सेवा केंद्रचालक आहे.
हैदराबामध्ये ई-सेवा केंद्र चालवणाऱ्या अझिमुद्दीन नईमुद्दीन खान (रा. किशन बाग, बहादूरपूरा, हैदराबाद) यानं अवघ्या 500 रुपयात बनावट आयपीएसचे आयकार्ड तयार करून दिल्याची माहिती पोलीस चौकशीत समोर आली. त्यानंतर कराड पोलिसांच्या पथकानं हैदराबादला जाऊन संशयिताला अटक केली. संशयिताला दोन दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. सध्या, संशयित न्यायालयीन कोठडीत आहे.
तोतयाच्या नबाबी थाटाला तरुण भुलले-तोतया अधिकारी श्रीकांत पवार यानं 13 तरुणांची 90 लाख रुपयांची फसवणूक केली. पोलिसांना सातत्यानं गुंगारा देणाऱ्या आरोपीला 25 डिसेंबरला अटक केली. आरोपी हा दोन लाखांचा मोबाईल, हातात लाखाचं घड्याळ, पायात दहा हजाराचा शूज, ताज-ओबेरॉयसारख्या अलिशान हॉटेलात वास्तव्य करून रुबाबात वावरायचा. तसंच इनोव्हा कारमध्ये अंबर दिवा, इंग्रजी पुस्तकं, वर्दी आणि डायरी असायची. पोलीस दल, सैन्य दलात भरती होण्यासाठी स्टेडियम आणि क्रीडा संकुलाच्या मैदानावर सराव करणाऱ्या तरुणांना हेरून आपण आयपीएस अधिकारी (इंटेलिजन्स ब्युरो) असल्याचं सांगून आरोपी शासकीय नोकरीचं अमिष दाखवायचा. तरुणही त्याच्या नबाबी थाटाला भुलून नोकरीसाठी पैसे द्यायचे.
फसवणुकीच्या पैशातून तोतया अधिकाऱ्याची चैन-नोकरी लावण्यासाठी तरुणांकडून घेतलेल्या पैशातून तोतया आयपीएस अधिकाऱ्यानं दोन लाखाचा मोबाईल, एक लाखाचं ॲपलचं घड्याळ, दहा हजाराचा शूज अशा महागड्या वस्तू खरेदी केल्या आहेत. ताज, ओबेरॉयसारख्या पंचतारांकित हॉटेल्समध्ये वास्तव्य करणं. त्याठिकाणी मिटिंग घेऊन तो तरुणांवर छाप पाडत होता. त्यानं इनोव्हा कार पुण्यातून भाड्यानं घेतली होती. तरुणांकडून उकळलेले पैसे तोतया अधिकाऱ्यानं चैनीवर उडवल्याचं स्पष्ट झालंय.
युपीएससीची दोनवेळा दिली होती परीक्षा- या तोतयानं युपीएससीची दोनवेळा पूर्व परीक्षा दिली होती. दोन्ही वेळा त्याला अपयश आलं. परंतु, आपण यूपीएससी उत्तीर्ण झाल्याचं भासवून सत्कार समारंभाला हजेरी लावली होती. मात्र, काही दिवसांनी बिंग फुटल्यानंतर त्याच्यावर पुण्यात गुन्हा दाखल झाला होता. यापूर्वी आरोपीविरोधात सोलापूर जिल्ह्यातही फसवणुकीच्या तक्रारी नोंद आहेत. धक्कादायक बाब म्हणजे नोकरी लावण्याची कार्यवाही सुरू असल्याचं भासवण्याकरिता त्यानं राज्य शासन आणि पोलीस दलाच्या नावे बनावट ई-मेल आयडी केला होता.
हेही वाचा-
- बिटकॉइन घोटाळ्याचा आरोप, काँग्रेससह सुप्रिया सुळेंची माजी आयपीएस अधिकाऱ्याविरोधात सायबर क्राईमकडं तक्रार
- तोतया आयपीएस अधिकाऱ्याच्या 'खऱ्या' पोलिसांनी आवळल्या मुसक्या, नोकरीच्या अमिषानं तरुणांची ९० लाखांची फसवणूक