सातारा : सातारा जिल्ह्यातील फलटण परिसरात गोवंशाची अवैध वाहतूक आणि कत्तल करणाऱ्या कुरेशी टोळीतील पाच जणांना दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आलंय. या टोळीवर फलटण शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अनेक गुन्हे नोंद आहेत. या कारवाईसह जिल्ह्यातून तडीपार करण्यात आलेल्या गुन्हेगारांची संख्या 150 झाली आहे.
दोन वर्षांसाठी तीन जिल्ह्यातून तडीपार : सातारा जिल्ह्यातील फलटण शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सातत्यानं गुन्हे करणाऱ्या कुरेशी टोळीचा प्रमुख तय्यब आदम कुरेशी, आरीस गफुर कुरेशी, बिलाल रफिक कुरेशी, झिशान ऊर्फ दिशान इमाम बेपारी ऊर्फ कुरेशी आणि आबु ऊर्फ अल्ताब अफसर कुरेशी (सर्व रा. कुरेशीनगर, फलटण) अशी तडीपार करण्यात आलेल्या गुन्हेगारांची नावं आहेत. या टोळीला संपूर्ण सातारा जिल्हा, सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस आणि पुणे जिल्ह्यातील बारामती तसंच पुरंदर तालुका हद्दीतून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आलं आहे.
गोवंशाची अवैध वाहतूक आणि कत्तलीचे गुन्हे : प्राण्यांचा छळ प्रतिबंधक कायद्यानुसार गोवंशीय जनावरांची कत्तल करण्यास, कत्तलीसाठी वाहतूक करण्यास मनाई असताना कुरेशी टोळीवर गोवंशीय जनावरांची कत्तलीसाठी वाहतूक केल्याचे गुन्हे दाखल होते. फलटणचे पोलीस निरीक्षक हेमंतकुमार शहा यांनी कुरेशी टोळीविरुद्ध हद्दपारीचा प्रस्ताव सादर केला होता. या टोळीकडून सातत्यानं गुन्हे होत असल्यानं त्यांच्यावर कारवाईची मागणी जनतेतून करण्यात आली होती. पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या समोर हद्दपारीच्या प्रस्तावावर सुनावणी झाल्यानंतर त्यांनी या टोळीला हद्दपार करण्याचा आदेश पारित केला.
गुन्हेगारांच्या तडीपारीचं दीड शतक : सातारा जिल्हा पोलिसांनी नोव्हेंबर 2022 पासून आजअखेर 33 टोळ्यांमधील एकूण 150 जणांवर तडीपारीची कारवाई केली आहे. जिल्ह्यात कायदा, सुव्यवस्था राखण्यासाठी सराईत गुन्हेगारांविरुद्ध हद्दपारी, मोक्का, एमपीडीएखाली कारवाई करून त्यांचं कंबरडं मोडलंय. समाजाला उपद्रवी ठरणाऱ्या गुन्हेगारी टोळ्यांवर यापुढंदेखील तडीपारीची कारवाई केली जाणार असल्याचा इशारा पोलीस अधिक्षकांनी दिलाय.
हेही वाचा -
- साताऱ्यात क्रेटा कारमधून १ कोटीची रोकड जप्त, रक्कम नेमकी कुणाची? तपास सुरू
- लिव्ह इन पार्टनरची हत्या करून दिली हरविल्याची तक्रार, पोलिसांनी गुन्ह्याचा 'असा' लावला छडा
- कर्ज प्रकरण मंजूर होत नसल्याच्या रागातून बँक मॅनेजरवर कोयत्याने हल्ला, संशयिताला अटक