सातारा Satara Accident News : सज्जनगड-ठोसेघर मार्गावरील बोरणे घाटात सेल्फी काढताना तरुणी थेट दरीत कोसळली. मंकी पॉईंट परिसरात शनिवारी (3 ऑगस्ट) सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास ही घटना घडली. दरीत पडलेल्या तरुणीला बाहेर काढून तिचा जीव वाचविण्यात रेस्क्यू टीम, ठोसेघर वन व्यवस्थापन समिती आणि सातारा ग्रामीण पोलिसांना यश आलंय. नसरीन अमीर कुरेशी (वय २९, रा. वारजे, पुणे) असं जखमी तरूणीचं नाव आहे.
सेल्फीच्या नादात तरुणी पडली दरीत : सातारा जिल्ह्यातील पर्यटनस्थळांवर पावसाळी पर्यटनासाठी मोठी गर्दी होत आहे. मात्र, पर्यटनस्थळांवरील धोकादायक ठिकाणी स्वतःच्या सुरक्षेची काळजी न घेता तरुण आणि तरुणी सेल्फी काढत आहेत. मात्र, धोकादायक ठिकाणी सेल्फी घेण्याचा प्रयत्न एका तरुणीच्या चांगलाच अंगलट आलाय. सेल्फी काढताना ती तरुणी 100 फूट दरीत पडली.
साताऱ्यातील बोरणे घाटात सेल्फीच्या नादात तरुणी पडली दरीत, रेस्क्यू टीमने वाचवला जीव (ETV Bharat Reporter) रेस्क्यू टीमनं तरूणीला दरीतून काढलं बाहेर : तरुणी दरीत पडल्याची माहिती मिळताच रेस्क्यू टीमसह ठोसेघर वन व्यवस्थापन समिती सदस्य आणि सातारा ग्रामीण पोलीस घटनास्थळी दाखल झाले. वेगाने बचावकार्य राबवून त्यांनी तरुणीला दरीतून बाहेर काढलं. दरीत पडल्यानं तरुणी गंभीर जखमी झाली होती. उपचारासाठी तिला साताऱ्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.
ठोसेघरला जाताना घडली घटना :जखमी तरुणी नसरीन कुरेशी हिच्यासह एकूण सात जण स्कॉर्पिओ गाडीतून ठोसेघरच्या दिशेनं जात होते. बोरणे घाटात थांबल्यानंतर नसरीन कुरेशी ही सेल्फी काढण्याच्या नादात दरीत पडली. तिच्या सोबत असलेल्यांनी आरडाओरडा केला. त्यामुळं ही घटना उघडकीस आली. त्यानंतर दरीमध्ये दोरखंड टाकून तरुणीला दरीतून वर काढण्यात आलं.
रील बनवताना 300 फूट खोल दरीत कोसळली :काही दिवसांपूर्वी अशीच एक घटना रायगडमध्ये घडली होती. मुंबईतील तरुणी अन्वी कामदार ही आपल्या सात सहकाऱ्यांसह वर्षासहलीसाठी माणगावमधील कुंभे इथं आली होती. एका कड्यावर इन्स्टाग्रामसाठी रील बनवत असताना तोल जाऊन ती 300 फूट दरीत कोसळली. तिच्या सहकाऱ्यांनी यासंदर्भातील माहिती माणगाव पोलीस ठाण्यात कळवली. माणगांवचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निवृत्ती बोराडे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी स्थानिक बचाव पथकांना पाचारण केलं. दोरीच्या साहाय्यानं बचाव पथकं दरीत उतरली. यावेळी अन्वी गंभीर जखमी अवस्थेत असल्याचं आढळलं. तिला तात्काळ स्ट्रेचरच्या साहाय्यानं दोरीनं ओढून वर काढण्यात आलं. मात्र, माणगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात नेण्यापूर्वी तिचा मृत्यू झाला होता.
हेही वाचा -
- रील बनवताना 300 फूट खोल दरीत कोसळली; रेस्क्यू ऑपरेशन यशस्वी पण जीव वाचवण्यात अपयश - Aanvi Kamdar
- मित्र रिल्ससाठी शूट करताना तरुणीनं चुकून टाकला रिव्हर्स गिअर, दरीत कार कोसळल्यानंतर गमाविलं आयुष्य - Chhatrapati Sambhajinagar Accident
- रील करताना 300 फूट दरीत कोसळली, मुंबईतील रील स्टारचा रायगडच्या दरीत पडून मृत्यू - Reel Star Aanvi Kamdar