बीड- जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची राज्यभरात चर्चा सुरू असताना जिल्हा प्रशासनानं जमावबंदीचे आदेश लागू केले आहेत. ही जमावबंदी 14 जानेवारीपासून 28 जानेवारीपर्यंत लागू असणार आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे वाल्मिक कराडची (Valmik Karad case) सीआयडी कोठडी संपत असल्यानं त्याला आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी बीडमध्ये जमावबंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचं जिल्हाधिकारी प्रशासनानं म्हटलं आहे. मराठा आरक्षणाचे समर्थक मनोज जरांगे पाटील यांनी 25 जानेवारीपासून उपोषण करणार असल्याचा इशारा दिला होता. त्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यात जमाबंदी लागू केली आहे का? असा सवालदेखील आता उपस्थित होत आहे.
वाल्मिक कराड याला न्यायालयात करणार हजर-संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सात आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात सापडले आहेत. मात्र, एक आरोपी अजूनही फरार आहे. त्याला अटक करण्यासाठी पोलिसांचे काही पथके रवाना करण्यात आली आहेत. खंडणी गुन्ह्यातील आरोपी वाल्मिक कराडला केज येथील न्यायालयात आज हजर करण्यात येणार आहे. 31 डिसेंबर रोजी वाल्मिक कराड हा पुणे येथील सीआयडीच्या मुख्यालयात शरण आला होता. त्याला तिथून रात्री उशिरा केज न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. त्यानंतर त्याला 14 दिवसाची सीआयडी कोठडी ठोठावण्यात आली होती.
वाल्मिक कराडवर मकोका दाखल करण्याची मागणी-राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय असलेल्या वाल्मिक कराड याच्यावर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. वाल्मिक कराड हा सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मास्टरमाईंड असल्याचा विरोधकांकडून आरोप करण्यात आलेला आहे. कराड याच्यावर संतोष देशमुख यांच्या हत्येचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आलेली आहे. कराड हे निकटवर्तीय असल्यानं राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी आमदार जितेंद्र आव्हाड आणि आमदार प्रकाश सोळंके यांनी केली होती. मात्र, एसआयटी आणि सीआयडी चौकशीत सुरू आहे. चौकशीत दोषी आढळले तरच त्यांचा राजीनामा घेण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांनी स्पष्ट केले.
आठ जणांवर मकोका गुन्हा दाखल-सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येशी संबंधित खंडणी प्रकरणातील आरोपी विष्णू चाटे याला सोमवारी बीड जिल्ह्यातील न्यायालयानं १८ जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात एसआयटीनं यापूर्वीच आठ आरोपींविरोधात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत (मकोका) गुन्हा दाखल केला आहे. सुदर्शन घुले, प्रतीक घुले, सुधीर सांगळे, कृष्णा आंधळे, विष्णू चाटे, सिद्धार्थ सोनवणे, महेश केदार आणि जयराम चाटे यांच्यावर मकोका अंतर्गत खटला चालविण्यात येणार आहे.
- काय आहे मकोका कायदा?संघटित गुन्हेगारी करणाऱ्या आरोपीला मकोकाच्या कलम ३ (१) नुसार किमान पाच वर्षे ते जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते. त्यात आरोपीची मालमत्ता जप्त करण्याचीदेखील तरतूद आहे. मकोका कायद्यातील कडक तरतुदींमुळे आरोपीला जामिन मिळत नाही.
हेही वाचा-
- बीड खंडणी प्रकरण : वाल्मिक कराड केज न्यायालयात हजर, सीआयडीचा मोठा दावा
- संतोष देशमुख हत्याकांड : वाल्मिक कराडला घेऊन सीआयडी पथक न्यायालयात दाखल, सरकारी वकिलांचा खटला लढण्यास नकार