बीड- मस्साजोग येथील सरंपच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील फरार आरोपींना अटक करण्यासाठी बीडमधील नागरिक आज 'मूक मोर्चा' काढला. अशातच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी फरार झालेल्या तीन आरोपींची हत्या झाल्याची माहिती देणारा फोन आल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून राज्यात वातावरण तापण्याची चिन्हे आहेत.
Live Updates
- सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी फरार आरोपींची हत्या झाल्याचं वक्तव्य केलं होतं. मात्र, याचं खंडन भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी केलं आहे. ते म्हणाले, "त्यांचा खून झालेला नाही. अंजलीताई, आपण असं वक्तव्य करू नका."
- "वाल्मिक कराडच्या गुंडांनी गावातील एका समाजातील लोकांच्या मुलांना मारहाण केली. त्यावेळी संतोष देशमुख पुढे आले होते. हत्येच्या कटात वाल्मिक कराडचे नाव टाका. वाल्मिक कराडला कधी अटक होणार आहे. धनंजय मुंडे यांचं वाल्मिक कराड यांना संरक्षण आहे," असा आरोप आमदार संदीप क्षीरसागर यांनी केला. "न्याय मिळेपर्यंत लढत राहणार आहे. तपास होईपर्यंत धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा," याचा आमदार क्षीरसागर यांनी पुनरुच्चार केला.
बीडमध्ये संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधात 'मूक मोर्चा' जिल्हाधिकारी कार्यालयावर आज धडकला आहे. बीड शहरामध्ये विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून सुभाष रोड मार्गे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यापासून शिवतीर्थ छत्रपती शिवाजी महाराज चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा धडकला आहे. या मोर्चात नागरिकांसह विविध राजकीय नेते सहभागी झाले आहेत.
बीड महामोर्चा (Sarpanch Santosh Deshmukh murder case updates)
सीआयडीकडून शुक्रवारी बीडमध्ये चौकशी-
- मस्साजोग येथील एका कंपनीकडे 2 कोटी रुपये खंडणी मागितल्याचा गंभीर आरोप असलेला वाल्मिक कराड फरार आहे. मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड याच्यावर खंडणीचाही गुन्हा दाखल करण्यात आलाेला आहे. त्याही प्रकरणात तो अद्याप फरार आहे. त्याचा शोध घेण्यासाठी सीआयडीनं वाल्मिक कराडची पत्नी मंजिरी कराड यांची दोन ते अडीच तास चौकशी केली आहे. त्यानंतर त्यांना सोडून देण्यात आलंय. गुन्हा दाखल झाल्यानंतर वाल्मिक कराड फरार आहे. त्यानंतर त्यासंदर्भातील चौकशीचा भाग असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं.
- सीआयडीकडून बीड राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांचीही चौकशी करण्यात आली. चौकशी झाल्यानंतर चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, " मी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष आहे. या दरम्यान धनंजय मुंडे यांच्या पीआरचं काम वाल्मिक कराड हे बघायचे. माझा त्यांच्याशीसुद्धा संपर्क होता. मी त्यांना ओळखतो का? हे विचारण्यासाठी मला पोलिसांनी बोलून घेतले होते."
- वाल्मिक कराडच्या दोन अंगरक्षकांची सीआयडीकडून कसून चौकशी करण्यात आली. बीड शहर पोलीस ठाण्यात या सर्वांची चौकशी झाली.
फरार झालेल्या तीन आरोपींची हत्या? हत्याकांडातील मुख्य फरार आरोपी सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे, सुधीर सांगळे हे तिघे फरार आहेत. या आरोपींची हत्या झाल्याचा दावा करणारा फोन सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांना आला होता. त्याबाबत त्यांनी सांगितले, "काल रात्री मला अनोळखी नंबरवरून फोन आला. त्यांनी मला व्हाट्सअप कॉल रिसिव्ह करण्यास सांगितले. मी त्यांना म्हटलं की, माझ्याकडे व्हाट्सअप कॉल ऑटोब्लॉक आहेत. त्यामुळे त्याच्यावर बोलता येणार नाही. तुमचं जे काही म्हणणं आहे ते मेसेज करा. त्यावर त्यांनी मला दोन ऑडिओ नोट पाठवल्या आहे. मी त्या ओपन केल्यानंतर लगेचच समोरून डिलीट झाल्या आहेत. त्यानंतर आणखी दोन ऑडिओ नोट आल्या. त्या मी सुरुवातीला फॉरवर्ड केल्या. मग प्ले केल्या. यात त्या माणसानं तीन आरोपींची हत्या झाल्याची माहिती दिली आहे. या तिघांचेही मृतदेह कर्नाटकातील एका भागात सापडल्याचं व्हाईस नोटमध्ये म्हटलं आहे. हा नंबर मी ट्रू कॉलरवर शोधला. त्यावर 'गुठे गोसावी' असं त्या व्यक्तीचं नाव आलं आहे. हा व्यक्ती बीडमधीलच असल्याचं समजत आहे. या ऑडिओ नोट आणि ही सर्व माहिती मी बीडच्या एसपींना दिली आहे."
हेही वाचा-
- सरपंच देशमुखांच्या खुनाचे आरोपी 18 दिवसानंतरही मोकाट; बीडचे नागरिक काढणार भव्य मोर्चा
- बीड हादरलं! केज तालुक्यातील सरपंचाची अपहरण करुन हत्या