मुंबई :संतोष देशमुख हत्या प्रकरणी ( Sarpanch Santosh Deshmukh Murder case:) तपास करत असलेल्या एसआयटीमध्ये बदल करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. तर, आंबेडकर चळवळीचे नेते विजय वाकोडे यांच्या मुलाला शासकीय सेवेत घेण्याचे आश्वासन फडणवीसांनी दिल्याची माहिती आमदार सुरेश धस यांनी दिली. आंदोलनाशी संबंध नसलेल्या कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे घेण्याचं आश्वासनदेखील मुख्यमंत्र्यांनी दिल्याचं आमदार धस यांनी सांगितलं.
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात त्यांच्या कुटुंबीयांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर आमदार सुरेश धस यांनी याविषयी माहिती दिली. यावेळी त्यांनी मंत्री धनंजय मुंडे आणि त्यांचे निकटवर्तीय असलेल्या खंडणी गुन्ह्यातील आरोपी वाल्मिक कराडचं नाव न घेता निशाणा साधला. भाजपा आमदार धस म्हणाले, " एसआयटीमध्ये दोन दिवसात बदल झालेले दिसून येतील. आका कुणाला काय बोलला? आकाचा आका कुणाला काय बोलला? हे समोर येईल. सराईत गुन्हेगारांचं कृत्य समोर येईल."
त्यांची बिनभाड्याच्या खोलीत रवानगी होईल-मुख्यमंत्रीफडणवीस यांनी संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांना 45 मिनिटे वेळ दिला. विजय वाकोडे यांच्या मृत्यूप्रकरणी त्यांच्या कुटुंबीयांशी संवाद साधला. संतोष देशमुख प्रकरणातील आरोपी कितीही मोठा असो, कुणीही असो. त्याला सोडले जाणार नाही, याची ग्वाही फडणवीस यांनी दिल्याची माहिती धस यांनी दिली. पुढे धस म्हणाले, " दिवंगत संतोष देशमुख आमच्या भाजपाचे बुथ प्रमुख होते. पंकजा मुंडे, प्रीतम मुंडे, नमिता मुंदडा यांच्या निवडणुकीत देशमुख हे बुथ प्रमुख होते. या प्रकरणाशी संबंध असलेल्यांची बिनभाड्याच्या घरात रवानगी होईल. संतोष यांच्या पत्नीला सरकारी नोकरीत सामावून घ्यावं. लातूर जिल्ह्यात पोस्टिंग करावी," अशी मागणी केल्याची त्यांनी माहिती दिली.
दोषी पोलीस अधिकाऱ्यांना बडतर्फ करण्याची मागणी - "परभणी येथे पोलिसांच्या अमानुष मारहाणीत सोमनाथ सुर्यवंशी यांचं निधन झालं. त्या तणावात विजय वाकोडे यांचा मृत्यू झाला. ज्या पोलीस अधिकाऱ्यांमुळे सुर्यवंशी यांचा मृत्यू झाला, त्या अधिकाऱ्यांविरोधात हत्येचा गुन्हा नोंदवावा. त्यांना सेवेतून बडतर्फ करावे. या मागणीवर मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला," असं आशिष वाकोडे म्हणाले. "हातात दगड नसलेल्या कार्यकर्त्यांविरोधातील गुन्हे मागे घ्यावेत. सुर्यवंशी आणि वाकोडे कुटुंबीयांचे पुनर्वसन करावे, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. त्यावर सकारात्मक प्रतिसाद मिळाला", असं आशिष वाकोडे यांनी सांगितलं.