बीड :सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडला न्यायालयानं 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी ठोठावली आहे. या प्रकरणी वाल्मिक कराड याला जिल्हा कारागृहात ठेवण्यात आलं आहे. मात्र बुधवारी मध्यरात्री वाल्मिक कराडच्या पोटात दुखू लागल्यानं त्याला उपचारासाठी बीड जिल्हा रुग्णालयात मध्यरात्री एक वाजता दाखल करण्यात आलं. यावेळी त्याच्यावर उपचार करण्यात आले. मात्र प्रकृती नाजूक असल्यानं त्याच्यावर बीडच्या जिल्हा रुग्णालयातील आयसीयुमध्ये उपचार सुरू करण्यात आले आहेत. बुधवारी बीड जिल्हा सत्र न्यायालयात मकोका अंतर्गत व्हिडिओ कॉन्फरन्सींगनं सुनावणी घेण्यात आली. यामध्ये वाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी ठोठावण्यात आली आहे.
वाल्मिक कराडनं दोन कोटीची खंडणी मागितल्याचा आरोप :आवादा कंपनीच्या मॅनेजरला दोन कोटीची खंडणी मागितल्याचा आरोप वाल्मिक कराडवर करण्यात आला. या संदर्भात ही सुनावणी घेण्यात आली. न्यायालयानं वाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यामुळे आता येणाऱ्या 14 दिवसांच्या कोठडीनंतर काय कारवाई होते, हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे.