मुंबई :बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची गेल्या महिन्यात निर्घृण हत्या करण्यात आली. या प्रकरणावरुन महाराष्ट्राचं राजकारण चांगलंच पेटून उठलंय. मागील काही दिवसांपासून या प्रकरणात मोर्चे, आंदोलन, बंद पुकारले जात असून आज देशमुख यांच्या कुटुंबीयांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे.
आरोपी कोणीही असला तरी त्याला सोडणार नाही :“मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनात जे सांगितलं होतं, तेच आश्वासन आम्हाला दिलं आहे. आरोपी असणाऱ्या कोणालाही सोडणार नाही, जे आरोपी आहेत त्यांना शिक्षा दिली जाईल. महाराष्ट्राला यातून एक उदाहरण पाहायला मिळणार आहे, इथे गुन्हेगारांना माफ केलं जात नाही आणि तसं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याचं धनंजय देशमुख यांनी सांगितलं". फडणवीस यांच्या भेटीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी संतोष देशमुख यांची मुलगी, आमदार सुरेश धस, आमदार नमिता मुंदडा उपस्थित होते.
प्रतिक्रिया देताना धनंजय देशमुख (ETV Bharat Reporter)
आम्हाला न्याय हवा आहे : "मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबद्दल मुख्यमंत्री योग्य निर्णय घेतील. त्यांच्यासोबत आम्ही चर्चा केली. या प्रकरणाच निःपक्षपाती चौकशी व्हावी. आम्हाला न्याय हवा आहे. कोणीही कितीही मोठा व्यक्ती असो पण त्याला कठोर शिक्षा व्हायला हवी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडं केली. या प्रकरणात जेवढ्या एफआयआर दाखल झाल्या त्या सगळ्या आम्ही मुख्यमंत्र्यांना दिल्या आहेत. संबंधित सर्व आरोपींच्या सीडीआरचा तपास व्हावा. एसआयटी चौकशी संदर्भात काय बदल करायला हवेत, याबाबतही आम्ही चर्चा केली. वाल्मिकी कराड यांचा एफआयआर दिला आहे. हत्येशी त्यांचा काय संबंध आहे, याचा तपास व्हावा अशी मागणी केली आहे", अशी माहिती धनंजय देशमुख यांनी दिली.
सागर निवासस्थानी झाली भेट: बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं कुटुंब आणि परभणी येथील आशिष वाकोडे यांच्या कुटुंबीयांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत सागर निवासस्थानी भेट घेतली. वाकोडे कुटुंबीयांसोबत भीम आर्मीचे अशोक कांबळे देखील सागरवर आले होते. बीडमधील भाजपाचे आमदार सुरेश धस देखील यावेळी उपस्थित होते.
हेही वाचा -
- "संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या चौकशीचे ऑडिओ व्हिडिओ चित्रीकरण करा", अंजली दमानिया यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
- संतोष देशमुख कुटुंबीयांना न्यायासाठी मुख्यमंत्र्यांकडे जावं लागणं हे दुर्दैवी; संभाजीराजेंचं टीकास्त्र
- संतोष देशमुख हत्याकांड: आरोपी विष्णू चाटे, जयराम चाटे, महेश केदार, प्रतिक घुले यांच्या सीआयडी कोठडीत वाढ