मुंबई Sanjay Raut On Pm Modi : उबाठा गटाचे नेते संजय राऊत यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरुन केलेल्या भाषणावर जोरदार टीका केली. देशात चर्चेला नेहमीच वाव असतो, मात्र पंतप्रधान मोदींच्या राज्यात चर्चेला वाव आहे का, असा सवाल त्यांनी केला. लाल किल्ल्यावर काँग्रेस नेते राहुल गांधी हे 10 वर्षानंतर पहिल्यांदाच उपस्थित होते. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या पक्षाचं नेतृत्व करतात, ते तिरंगा मानायला तयार नाहीत. केवळ पंतप्रधान असल्यामुळे त्यांना तिरंगा फडकवावा लागतो, अशी जोरदार टीका संजय राऊतांनी केली.
पंतप्रधान मोदी जवानांचं बलिदान रोखू शकले नाहीत :देशात 78 वा स्वातंत्र्यदिन साजरा होत असताना सीमेवर जवानांचं बलिदान झालं आहे. 10 वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जवानांचं सीमेवर होणारं बलिदान रोखू शकले नाहीत. आताच एका कॅप्टनसह दोन जवानांचं बलिदान झालं. या जवानांच्या बलिदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी चर्चा करणार का, असा सवाल संजय राऊत यांनी केला. आतापर्यंत 17 हल्ले झाले असून 50 पेक्षा जास्त भारतीय जवान जखमी झाले आहेत. आजदेखील पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भाषण करताना तिकडं रक्ताचे सडे पडतात, असंही संजय राऊत म्हणाले.
370 कलम हटवून तुम्हाला फायदा झाला? :देशात सध्या वक्फ बोर्ड जमिनींचा विषय चर्चेत आहे. यावर बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले की, "मोदी यांच्याकडं पूर्ण बहुमत नाही. आपल्याकडं पूर्ण बहुमत नसताना असे विषय चर्चेला आणणं योग्य नाही. अशानं देशातील शांतता आणि सुव्यवस्था बाधित होऊ शकते. तुम्ही बघा जम्मू काश्मीरमधून 370 कलम हतवले. त्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये काय सुधारणा झाली? पंतप्रधान नरेंद्र मोदी भाषण करताना आमच्या जवानांच्या रक्ताचे सडे पडतात. 370 कलम हटवून तुम्हाला फायदा झाला? जनतेला काय फायदा झाला?" असा प्रश्न देखील संजय राऊत यांनी विचारला आहे.