मुंबई : विधानसभा निवडणूक 2024 ची रणधुमाळी जोरदार सुरू आहे. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. उबाठा खासदार संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप केला आहे. सरकारी गाड्यातून पैशांचं वाटप सुरू आहे, असा जोरदार हल्लाबोल खासदार संजय राऊत यांनी केला आहे. त्यांच्या या आरोपांमुळे मोठा वाद होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कोल्हापूरची जागा आम्ही अगोदर मागितली होती. मात्र काँग्रेस या जागेसाठी अडून बसल्यानं आम्ही ही जागा काँग्रेसला सोडली. आमचा उमेदवारही बंडखोरी करू शकला असता, मात्र आम्ही अन्याय झाला तरी सहन करतो, असंही त्यांनी यावेळी सांगितलं.
रश्मी शुक्लांना बढती देऊन बेकायदेशीर कामं :याप्रसंगी बोलताना संजय राऊत म्हणाले की, "ज्या अधिकाऱ्यांनी विरोधकांचे फोन टॅप केले. बेकायदेशीरपणे ते ऐकले. जो अधिकारी निलंबित असून तुरुंगात जाण्याच्या तयारीत होता. अशा व्यक्तीला सरकार बदलल्यानंतर पोलीस महासंचालक पदी भरती देण्यात आली. त्यांच्याकडून अनेक बेकायदेशीर कामे करून घेतली गेली. म्हणून अखेर देवेंद्र फडणवीस यांच्या लाडक्या ताई रश्मी शुक्ला यांना पोलीस महासंचालक पदावरून हटवण्यात आलं. हे पद अतिशय प्रतिष्ठेचं आहे. या पदावर कोणाला बसवावं याचं भान गृहमंत्र्यांना नसेल तर त्यांना प्रशासन, नैतिकता कळत नाही. आम्ही निवडणूक आयोगाचे आभारी आहोत. त्यांनी आता भाजपाचा अजेंडा राबवू नये, याची काळजी घ्यावी," असंही संजय राऊत म्हणाले आहेत.
सर्वात मोठा बखेडा ईव्हीएमचा :निवडणुका पारदर्शकपणे होतील का यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, "सर्वात मोठा बखेडा हा ईव्हीएमचा आहे. आज अमेरिकेच्या महासत्तेची निवडणूक होत आहे. तेथील जनता बॅलेट पेपरवर मतदान करत आहे. जो देश ज्ञानात, विज्ञानात, संशोधनात सर्वात पुढं आहे. ते सुद्धा त्यांच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक बॅलेट पेपरवर घेतात. हे राज्याच्या आमच्या निवडणूक आयोगाला समजत नसेल, तर त्यांच्या कार्यपद्धतीवर कायम प्रश्नचिन्ह राहील. तसेच ज्यांनी बंडखोरी केली आहे, त्यांच्यावर कारवाई करायला आमच्याकडून सुरुवात झाली आहे," असंही संजय राऊत यांनी यावेळी सांगितलं.