महाराष्ट्र

maharashtra

आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न; कोर्टाला देखील लेकीबाळी आहेत हे लक्षात घ्या, संजय राऊत यांची न्यायालयावर आगपाखड - Sanjay Raut On MVA Protest

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 24, 2024, 11:34 AM IST

Updated : Aug 24, 2024, 11:46 AM IST

Sanjay Raut On MVA Protest : महाविकास आघाडीच्या वतीनं आज महाराष्ट्र बंदचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र महाराष्ट्र बंदला मुंबई उच्च न्यायालयानं मनाई केली. त्यामुळे महाविकास आघाडीनं आज महाराष्ट्रभर आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. या प्रकरणी उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी न्यायालयावरही आगपाखड केली आहे.

Sanjay Raut On MVA Protest
खासदार संजय राऊत (ETV Bharat)

खासदार संजय राऊत (Reporter)

मुंबई Sanjay Raut On MVA Protest : महाविकास आघाडीचा शनिवारचा राज्यव्यापी बंद यशस्वी झाला असता, तर सरकारला अडचण निर्माण झाली असती. आमचा बंद राजकीय नव्हता, मात्र न्यायालयानं हस्तक्षेप करत बंद करण्यास मनाई केली. मात्र सगळ्यांना मुली आहेत, अशी आगपाखड संजय राऊत यांनी न्यायालयावर केली. जनभावनेचा न्यायालयानं आदर करायला हवा होता, असंही संजय राऊत यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे.

कोर्टाला देखील लेकीबाळी, सुना आहेत हे लक्षात घ्या :"अशा प्रकारच्या घटना राज्यात घडणं हा साधारण विषय नसून न्यायालयानं जनभावनेचा आदर करायला हवा होता. राज्यात कोणी सुरक्षित नाही, कोर्टाला देखील लेकी बाळी सुना आहेत हे लक्षात घ्या. न्यायालय माणूस असून न्यायदेवता एक स्त्री आहे," असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. "या देशात न्यायदेवतेवर देखील अत्याचार होत आहेत," असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. "कोर्टानं दबावाखाली निर्णय दिला का, असं आम्ही म्हणणार नाही. शिवसेनेच्या खटल्यावर तारखावर तारखा सध्या सुरू आहेत. हा देखील एक प्रकारे राज्यघटनेवर अत्याचार आहे. राज्यातील महिलांची, मुलींची, भगिनींची चिंता जास्त आहे. त्यामुळे रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला असून लोकशाहीत आंदोलनाला फार महत्त्व आहे. आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत असेल, तर लोकशाही काय कामाची," असा देखील थेट सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.

महाविकास आघाडीचा राजकीय बंद नव्हता :ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी महाविकास आघाडीकडून महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली. मात्र सरकारचा आवडता याचिकाकर्ता प्रत्येक वेळेस सरकारला आणि देवेंद्र फडणवीस यांना मदत करण्यासाठी येत असतो. त्याच्या याचिकेवर न्यायालयानं निर्णय दिला आणि न्यायालयानं बंद घटनाबाह्य असल्याचं म्हटलं. महाराष्ट्रात अल्पवयीन मुलींवर अत्याचार होत असून या घटनांची जबाबदारी याचिकाकर्ता की न्यायालय घेणार आहे का ?. जनभावनेचा आक्रोश देशभरामध्ये पोहोचवण्याचा आमचा उद्देश होता, हा काय राजकीय बंद नव्हता, असं संजय राऊत यांनी यावेळी सांगितलं.

बंदमुळे महायुती सरकारला अडचण झाली असती :"महाविकास आघाडीचा आजचा बंद जर यशस्वी झाला असता, तर राज्यातील महायुती सरकारला अडचण निर्माण झाली असती. देशात भारत बंद आणि महाराष्ट्र बंद देखील झाला, मात्र त्या विरोधात कोणी कोर्टात गेलं नाही. आम्ही न्यायालयाचा आदर राखत बंद जरी मागं घेतला, तरी महाविकास आघाडी राज्यभर तोंडाला काळ्या फिती बांधून निदर्शनं करणार आहे."

हेही वाचा :

  1. जनतेचा सरकारवर विश्वास नाही, म्हणून बदलापुरात जनतेचा आक्रोश आणि उद्रेक - संजय राऊत - Sanjay Raut on Badlapur
  2. "अनिल देशमुख आणि मी नागपूरमुळंच..."; संजय राऊतांचा देवेंद्र फडणवीसांवर निशाणा - Sanjay Raut
  3. "आम्हीच 'दलाल नंबर टू' चित्रपट काढून तुमचे काळे धंदे समोर आणू", संजय शिरसाटांचा राऊतांवर हल्लाबोल - Sanjay Shirsat on Sanjay Raut
Last Updated : Aug 24, 2024, 11:46 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details