मुंबई Sanjay Raut Slams Nana Patol : भाजपाला सत्तेतून हटवण्यासाठी विरोधकांनी एकत्रित येऊन इंडिया आघाडीची स्थापना केली. मात्र पंतप्रधान पदाचा चेहरा कोण असणार, याची घोषणा केली नाही. एका पत्रकार परिषदेत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी इंडिया आघाडीकडून उद्धव ठाकरे यांना पंतप्रधान पदाची संधी दिल्यास शरद पवार पाठिंबा देतील, अशा प्रकारचे वक्तव्य केल्यानं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली होती. आता पुन्हा संजय राऊत यांनी नाना पटोले यांच्यावर टीका केली आहे. नाना पटोले यांच्या बोलण्याकडं लक्ष देऊन नका. आम्ही काय बोलतो, हे काँग्रेसला कळत नाही, अशी टीका राऊत यांनी केली. त्यामुळे महाविकास आघाडीत पुन्हा एकदा 'इंडिया' आघाडीच्या पंतप्रधान पदाच्या चेहऱ्यावरुन संजय राऊत आणि नाना पटोले यांच्या जुंपली आहे.
राहुल गांधी यांच्यासोबत आमचे चांगले संबंध :महाराष्ट्रात महाविकास आघाडीत लोकसभेच्या जागा वाटपावरून ठाकरे गटावर काँग्रेस पक्षात नाराजी आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यात वारंवार शाब्दिक चकमक होत आहे. आता 'इंडिया' आघाडीच्या पंतप्रधान पदाच्या नावावरून दोघांमध्ये एकमेकाविरोधात वक्तव्य केली गेली. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्याकडून आता 'इंडिया' आघाडीकडून देश पातळीवर नेतृत्व करण्याची धमक उद्धव ठाकरे यांच्यात असून ते पंतप्रधान पदाचे दावेदार असल्याचं सांगितलं जात आहे. यावर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांनी संजय राऊत यांच्या बोलण्याकडं लक्ष देऊ नका, असं म्हटलं होतं. त्यानंतर संजय राऊत यांच्याकडून जोरदार उत्तर देत नाना पटोले यांच्या बोलण्याकडं लक्ष देऊ नका, राहुल गांधी यांच्यासोबत आमचे चांगले संबंध आहेत, असं राऊत यांनी स्पष्ट केलं.
उद्धव ठाकरे पंतप्रधान पदाचे उमेदवार असू शकतात : 'इंडिया' आघाडीकडून उद्धव ठाकरे देखील पंतप्रधान पदाचे उमेदवार असू शकतात, अशा प्रकारे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या विधानावर विचारलं असता संजय राऊत म्हणाले की, "हे मी म्हणालो नसून या संदर्भात मला माध्यमातून प्रश्न विचारण्यात आला होता, तुम्ही प्रश्न विचारतात त्याला आम्ही उत्तर देतो. 'इंडिया' आघाडीकडं पंतप्रधान पदासाठी खूप चेहरे आहेत. देशात कोणत्याही परिस्थितीत 300 पार करण्याचा विश्वासही त्यांनी बोलून दाखवला. 'इंडिया' आघाडीतील प्रमुख पक्षाचे लोक पंतप्रधान पदाचा उमेदवार निश्चित करतील. याविषयी माध्यमांनी विचारलं होतं की उद्धव ठाकरे पंतप्रधान पदासाठी पर्याय होऊ शकतात का? यावर मी का होऊ शकत नाही, असं उत्तर दिलं होतं. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी चांगल्या पद्धतीनं काम केले असून देशात त्यांचे चांगलं नाव आहे. मात्र 'इंडिया' आघाडीत एक नाही तर अजूनही चेहरे आहेत, असं मी म्हटले होतं. आम्ही पंतप्रधान पदावर कधी चर्चा करत नाही आणि करण्याची गरज नाही. पण आमच्याकडं खूप चेहरे आहेत, त्यातला एखादा चेहरा पंतप्रधान होईल," असंही राऊत म्हणाले. "आमची इच्छा आहे राहुल गांधी यांनी नेतृत्व करावं, देशात राहुल गांधी प्रचार करत आहेत. पक्षाचा 'इंडिया' आघाडीचा प्रचार करत आहेत. पण त्यांना सत्तेचा लोभ नाही. तानाशाहीला हरवणं हे आमचं सर्वांचं लक्ष आहे. भाजपाकडं एकच चेहरा आहे, दुसरा चेहरा आहे का? घिसापिटा तोच चेहरा गेल्या दहा वर्षापासून चालू असून लोक त्यांना स्वीकारणार नाहीत," असंही संजय राऊत म्हणाले. पंतप्रधान मोदी आणि त्यांचा पक्ष हरणार असल्याचे ते म्हणाले. "'इंडिया' आघाडीत पंतप्रधान पदाचे अनेक चेहरे असून त्यातील एक चेहरा उद्धव ठाकरे हे देखील आहेत."
देवेंद्र फडणवीस यांचं पंतप्रधान, गृहमंत्री होण्याचं स्वप्न :केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी अडीच वर्षे मुख्यमंत्री पदाचा शब्द देत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदित्यला मुख्यमंत्री बनून आपण दिल्लीला जाणार असल्याचं म्हटलं होतं. याबाबतचा दावा ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत केला होता. यानंतर उद्धव ठाकरे यांच्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपानं निशाणा साधला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना भ्रमिष्ट झाले असून मी त्यांना आदित्य ठाकरे मुख्यमंत्री बनवणार असा शब्द दिला नसल्याचं म्हणत त्यांना वेड लागलं असल्याचा टोला लगावला होता. यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पलटवार केला आहे. "प्रत्येक वेडा माणूस हेच सांगतो की मी वेडा नाही. प्रत्येक गुन्हेगार हेच सांगतो की मी गुन्हा केला नाही, हा मानवी स्वभाव आहे. त्या मानवी स्वभावापासून देवेंद्र फडणवीस सुद्धा वेगळे नाहीत. उद्धव ठाकरे यांनी जे सांगितले आहे ते शंभर टक्के सत्य आहे. उद्धव ठाकरे यांची जी चर्चा झाली, त्यानुसार आमचे संबंध खूप चांगले होते. आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरती बसून मी दिल्लीत जाईन, दिल्लीत अर्थमंत्री होईल, दिल्लीत गृहमंत्री होईल आणि मी प्रधानमंत्री होईल, त्यांचं स्वप्न मोठं होतं आणि ते स्वप्न बाळगायला काहीच हरकत नाही," असंही संजय राऊत म्हणाले. "महाराष्ट्राच्या नेत्याला असं नेतृत्व करण्याची संधी मिळणार असेल, तर आम्ही नक्कीच त्यांच्या पाठीशी उभे राहतो. पण त्यांचं हे स्वप्न बहुदा पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री शाह यांना आवडलं नाही. त्यामुळेच त्यांचे पंख कापून त्यांना महाराष्ट्रामध्ये डेप्युटी सीएम केलं, असं एकंदरीत जे काही राजकारण आम्हाला कळतं त्यानुसार दिसत आहे, असं म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना संजय राऊत यांनी चिमटा घेतला. मोठे स्वप्न जेव्हा फडणवीस जी पाहायला लागले, तेव्हा पंतप्रधान मोदी आणि शाह यांनी काहीतरी निर्णय घेतला. त्यानंतर महाराष्ट्रात त्यांना एकनाथ शिंदे या ज्युनिअर नेत्याच्या हाताखाली काम करायला लावलं, यालाच मोदी आणि शाह यांची राजनीती म्हणतात."
हेही वाचा :
- औरंगजेब आणि मोदी दोघेही एकाच मातीतले; खासदार संजय राऊत यांची टीका - Lok Sabha Election 2024
- अमरावतीत संजय राऊतांविरोधात भाजपा महिला आघाडी आक्रमक; नवनीत राणांविरोधात अपशब्द वापरल्याचा रोष - Sanjay Raut Criticized Navneet Rana
- संजय राऊतांना मानसिक उपचाराची गरज; आरोपांनंतर श्रीकांत शिंदेंचा हल्लाबोल - Shrikant Shinde On Sanjay Raut