मुंबई Sanjay Raut Slams Devendra Fadnavis :नवीनच बांधलेल्या संसद भवनामध्ये पावसाच्या पाण्यामुळं गळती लागली आहे. देशभरामध्ये मोदी-शाह यांच्या ठेकेदारांनी बनवलेले रस्ते, पूल यांची वाईट अवस्था आहे. देशभरातील अनेक प्रकल्प किती तकलादू आहेत, हे आता समजू लागले आहे. यातून किती कमिशन गेले असेल, याचा अंदाज लावता येईल. महाराष्ट्रात समृद्धी महामार्ग, अटल सेतू असे अनेक प्रकल्प बनवले. परंतु या प्रकल्पाची अत्यंत वाईट अवस्था आहे, अशी टीका संजय राऊत यांनी मोदी सरकारवर केली.
राम मंदिर बांधले त्यालाही लागली गळती :"अयोध्येत राम मंदिर बांधलं, त्यालाही गळती लागली. तेही काम नीट झालं नाही. आपापल्या ठेकेदारांना हजारो-हजारो कोटींची कामं द्यायची आणि त्या ठेकेदारांकडून निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून पैसे घ्यायचे. हे रस्ते, इमारतीपासून ते संसदेच्या इमारतीपर्यंत लूट सुरू आहे. त्यामुळे देशाची राष्ट्रीय अस्मिता कुठं शिल्लक आहे. यांना उलट प्रश्न विचारायचे नाही. शंका उपस्थित केली की तो राष्ट्रद्रोह. त्याला देशद्रोही ठरवले जाते," असा हल्लाबोल संजय राऊतांनी संसदेतील पाणी गळतीवरून मोदी सरकारवर केला.
उद्धव ठाकरेंनी घाव घातला :संजय राऊत म्हणाले की, "उद्धव ठाकरेंनी टीका केली नाही, तर तलवार ऊपसून घाव घातला आहे. देवेंद्र फडणवीस हे संघ विचाराचे असल्याचं म्हणतात. स्वतःला सुसंस्कृत, प्रखर राष्ट्रवादी मानतात. पण महाराष्ट्रात माणूस किती भ्रष्ट, अनितिमत्ता, क्रूर असू शकतो. ही त्यांनी आपल्या कपट आणि कट-कारस्थानातून दाखवलं आहे. हाच खरा चेहरा देवेंद्र फडणवीस यांचा आहे. त्यामुळं देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे संघ बदनाम होतोय," अशी टीका संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली. उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस राहतील, किंवा मी राहीन असं म्हटलं. पण आम्हीच राहणार आहोत. आणि तू जाणार आहेस. ही महाराष्ट्राच्या हितासाठी केलेली लढाई आहे. ही व्यक्तिगत टीका नाही आहे. ज्या पद्धतीनं देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या टोळीचा संघ परिवाराच्या विचारांशी काही संबंध नाही. संघाला फार मोठी परंपरा आहे. या टोळ्यांना घेऊन देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात दळभद्री घाणेरडं, गटारी पद्धतीचं राजकारण सुरू केलं. त्याचे परिणाम महाराष्ट्र बघतोय. महाराष्ट्राची अवस्था अत्यंत बिघडलेली आहे. याला सर्वस्वी जबाबदार देवेंद्र फडणवीस आहेत. हे मी अनेक दिवसापासून सांगतोय, महाराष्ट्राच्या मातीत ढोंग, कट-कारस्थान, कपाट हे चालत नाही. आम्ही कुणाच्या कुटुंबापर्यंत, मुलाबाळापर्यंत कधी गेलो नव्हतो. पण या लोकांनी याला सुरुवात केली," असा हल्लाबोल संजय राऊतांनी भाजपा आणि देवेंद्र फडणवीसांवर केला.