मुंबई : लोकसभा निवडणूक 2024 आम्ही 'इंडिया' आघाडीनं एकत्र लढवली. मात्र लोकसभा निवडणूक झाल्यापासून 'इंडिया' आघाडीची एकही बैठक झाली नाही. कोणतीही चर्चा नाही, कोणताही संवाद नाही, ओमर अब्दुल्ला, ममता बॅनर्जी, अखिलेश यादव, अरविंद केजरीवाल हे सर्व नेते 'इंडिया' अलायन्सचं आता अस्तित्वच नाही, असं म्हणतात. त्यामुळे मोठा पक्ष म्हणून या सगळ्यांना काँग्रेस पक्ष जबाबदार आहे, असा हल्लाबोल उबाठा खासदार संजय राऊत यांनी केला. जर 'इंडिया' आघाडी एकदा तुटली, तर पुन्हा कधीही तयार होणार नाही, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.
इंडिया आघाडीत कोणताही समन्वय, संवाद नाही : "'इंडिया' आघाडी जीवंत ठेवणं मोठा पक्ष म्हणून काँग्रेसचं काम होतं. मात्र लोकसभा निवडणूक झाल्यानंतर 'इंडिया' आघाडीच्या नेत्यांची एकही बैठक झाली नाही. आघाडीत कोणताही समन्वय नाही, चर्चा नाही, संवाद नाही. त्यामुळे देशभरातील नेत्यांची 'इंडिया' आघाडीवर नाराजी आहे. ओमर अब्दुल्ला, ममता बॅनर्जी, अखिलेश यादव, अरविंद केजरीवाल हे सर्व नेते आता 'इंडिया' अलायन्सचं अस्तित्व नाही, असं म्हणत आहेत," असा हल्लाबोल खासदार संजय राऊत यांनी केला.