मुंबई Sanjay Raut News :महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका दोन ते तीन महिन्यात होण्याची शक्यता आहे. मात्र, त्यापूर्वी राज्यातील राजकारण तापण्यास सुरुवात झाली आहे. राजकीय गाठीभेटींची राज्याच्या राजकारणात चांगलीच चर्चा होत आहे. तर दुसरीकडं धारावी पुनर्वसन प्रकल्पाच्या माध्यमातून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडत आहेत. आता तर, "धारावीच्या नावाखाली 'लँड जिहाद' सुरू आहे. याच सरकारच्या 10 वर्षाच्या काळात सर्वात जास्त 'लँड जिहाद' झाले आहेत," अशा शब्दांत खासदार संजय राऊतांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शरद पवार भेटीवर राजकारण तापलं : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची दहा दिवसांत दोन वेळा भेट झालेली आहे. यामुळं राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात आहेत. अशातच धारावी प्रकल्प आणि शिंदे-पवार भेटीचा काही संबंध आहे काय? असा प्रश्न संजय राऊतांना विचारल्यावर त्यांनी, "भेटी संदर्भात तुम्ही पवारांना विचारा. भेट धारावीसाठी झाली का मला सांगता येणार नाही. शिवसेना पक्षावर कितीही दबाव आला तरी धारावी पुनर्वसन प्रकल्पा संदर्भात कोणत्याही प्रकारचा घोटाळा होवू देणार नाही. लाडक्या उद्योगपतींच्या घशात मुंबई शहर जाऊ देणार नाही," असा इशारा त्यांनी सत्ताधाऱ्यांना दिला. मुंबईतील वीस भूखंड अदानींना देण्याचा जो वर्षा बंगल्यावर डाव सुरू आहे, त्याला राजकीय पक्ष अप्रत्यक्षपणे पाठीशी घालत आहे. सरकार आल्यानंतर धारावीचं टेंडर रद्द करू असं उद्धव ठाकरेंनी सांगितल्याची आठवणही त्यांनी करुन दिली.
दिल्लीत तीन दिवसांचा संवाद दौरा :लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर प्रथमच उद्धव ठाकरे तीन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर जात आहेत. हा त्यांचा संवाद दौरा असून ते इंडिया आघाडीच्या नेत्यांची भेट घेणार आहेत. सोबत महाविकास आघाडीच्या जागावाटपावर देखील चर्चा होऊ शकतात.