नागपूरSanjay Raut :पहिल्या टप्प्यात आमचे उमेदवार नसून महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत. कोणी कितीही सर्वे केले, तरी परिवर्तनाची सुरुवात विदर्भातून होईल, असा दावा उद्धव ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी केलाय. ते आज नागपूर विमानतळावर बोलत होते. जनता पक्ष पाहात नसून, महाविकास आघाडीचे उमेदवार बघत आहे. रामटेक मतदारसंघात आमच्या गटाचा उमेदवार नाही, मात्र मी महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी सभा घेत असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलंय. तसंच भाजपानं मुंबईत किमान एक तरी जागा जिंकून दाखवावी, असं आव्हान संजय राऊत यांनी दिलं.
फडणवीसांना आकडं लावण्याचा धंदा : 'लोकसभा निवडणुकीला हळूहळू रंग चढत आहे. निवडणुकींच्या जागांबाबत सर्वेक्षणं येत असून त्या सर्वेक्षणाशी आम्ही सहमत नाही. महाराष्ट्रात आम्हाला शंभर टक्के यश मिळणार. राज्यात 45 हून अधिक उमेदवार निवडून येणार असल्याचं देवेंद्र फडणवीस सांगतात. त्याची संख्या काहीही असो, त्यांना आकडेमोड करण्याची सवय आहे. निवडणुकीनंतर त्यांना आकडेच लावावे लागतील', असा टोला संजय राऊतांनी लगावला आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडी तसंच देशात इंडिया आघाडी यशस्वी होणार आहे. महाराष्ट्रात 35 तर देशात 305 जागा आम्हाला मिळतील, असा दावा संजय राऊत यांनी केलाय.
मुख्यमंत्र्यांना काहीच मिळणार नाही :रामटेक लोकसभा मतदारसंघात मुख्यमंत्र्यांना त्यांचा उमेदवार बदलावा लागला. ते विद्यमान खासदाराला तिकीट देऊ शकले नाहीत. त्यामुळं त्यांना रोड शो करू द्या. मात्र, त्यांच्या हातात काहीचं पडणार नाही, असा निशाना त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर साधला आहे.
पळपुट्यांच्या मागे राम कधी उभा राहत नाही :मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं प्रभू श्रीराम यांच्याबद्दलचं प्रेम खोटं आहे. कोणत्याही लढ्यात, संघर्षात एकनाथ शिंदे नव्हते. राम पळपुट्यांच्या मागे कधी उभा राहात नाही, तर आत्मविश्वासानं लढणाऱ्यासोबत राम असतात, असं राऊत म्हणाले.