मुंबई :केंद्र सरकारनं देशात 'वन नेशन वन इलेक्शन' योजना राबवण्याचं निश्चित केलं आहे. केंद्रीय मंत्रिमंडळानं 'वन नेशन वन इलेक्शन' योजनेला मंजुरी दिल्याची माहिती आहे. मात्र 'वन नेशन वन इलेक्शन'वाल्यांनो हरण्याची भीती असल्यानं तुम्ही मुंबई महापालिकेच्या निवडणुका घेतल्या नाहीत, असा जोरदार प्रहार शिवसेना (उबाठा) खासदार संजय राऊत यांनी केला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला केंद्रात मंत्रिपद देण्यासाठी शरद पवार यांचे पाच खासदार फोडा अन् मंत्रिपद घ्या, अशी ऑफर भाजपाने दिल्याचा दावाही संजय राऊत यांनी केला. त्यांच्या या दाव्यानं मोठी खळबळ उडाली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी 2029 पर्यंत राहतील का हा प्रश्न :केंद्रात सध्या एनडीए प्रणित पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वात भाजपा आणि मित्रपक्षांचं सरकार आहे. मात्र केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 2029 पर्यंत राहतील का. असा प्रश्न आहे असंही संजय राऊत यांनी स्पष्ट केलं. सध्या सरकार लोकशाही, स्वातंत्र्य उद्ध्वस्त करण्याच्या योजना आणत आहे. त्यामुळे या सरकारला नागरिक कंटाळले आहेत, असंही त्यांनी यावेळी सांगितलं.