मुंबई : राज्यात आता झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळून सुद्धा राज्याचा मुख्यमंत्री अजून घोषित झाला नाही. यावरून उबाठा नेते, खासदार संजय राऊत यांनी महायुतीला टोला लगावला आहे. "राज्यात भाजपाचाच मुख्यमंत्री होणार असून देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होणार असं सांगितलं जाते. परंतु याबाबत घोषणा कधी होणार? की आणखी कोणाचं नाव समोर येणार, ते माहित नाही," असंही संजय राऊत म्हणाले आहेत. मुंबईत ते बोलत होते.
राज्यात एकूण 76 लाख मतदान वाढलं :याप्रसंगी बोलताना संजय राऊत म्हणाले की, "राज्यात महायुतीचा जो विजय झाला आहे तो खरा नाही. रात्री साडेअकरा वाजेपर्यंत कुठं मतदान सुरू होतं हे निवडणूक आयोगानं आम्हाला सांगितलं पाहिजे. राज्यात एकूण 76 लाख मतदान वाढलं आणि महायुतीला बहुमत मिळालं. हरियाणामध्ये सुद्धा 14 लाख मतं वाढली आणि भाजपा सत्तेत आली. त्या पद्धतीनंच महाराष्ट्रात सुद्धा 76 लाख मतदान वाढले आणि भाजपा सत्तेत आली," असा आरोपही संजय राऊत यांनी केला.
मोठा निर्णय घेण्यासाठी हिंमत लागते : एकनाथ शिंदे हे त्यांच्या दरेगावात गेले असून तिथे ते मोठा बॉम्बस्फोट करणार असं वक्तव्य आमदार संजय शिरसाट यांनी केलं आहे. यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, "मोठा निर्णय घेण्यासाठी तशी हिंमत लागते. ज्यांना ईडी, सीबीआयची भीती आहे, असे लोक मोठा निर्णय घेऊ शकत नाहीत. आता एकनाथ शिंदे यांच्या डोळ्यात चमक दिसत नाही, ते हसत सुद्धा नाहीत. महायुतीकडं 200 पार संख्याबळ असताना सुद्धा राज्याला अजून मुख्यमंत्री भेटत नाही," असा टोलाही राऊत यांनी लगावला आहे.
आम्हालाही त्यांनी डंख मारले : संजय राऊत पुढे म्हणाले आहेत की, "महाराष्ट्राला विषारी नागांचा फार मोठा विळखा पडला आहे. त्यांच्यासोबत जाणाऱ्यांना ते नेहमी डंख मारतात. आम्हालाही त्यांनी डंख मारले होते. तशा पद्धतीचा डंख त्यांनी एकनाथ शिंदे यांना मारला आहे का? एकनाथ शिंदे आता पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांचे लाडके भाऊ राहिलेले नाहीत. तेव्हा एकनाथ शिंदे यांनी शिवसेना फोडली यासाठी त्यांच्यावर मेहरबानी म्हणून त्यांना मुख्यमंत्री पद दिलं गेलं होतं."
हेही वाचा :
- दिल्लीनं डोळे वटारले की एकनाथ शिंदेंना गप्प बसावं लागेल; संजय राऊतांचा हल्लाबोल, म्हणाले 'महायुतीनं स्वाभिमानाच्या गप्पा करू नयेत'
- दिल्लीश्वरांच्या वटारलेल्या डोळ्यांना बंडखोर घाबरत नाहीत-संजय राऊत
- 'शब्द पाळण्याची भाजपाची परंपरा नाही;' खासदार संजय राऊत यांची टीका