मुंबई : बीडमध्ये संतोष देशमुख यांचं अपहरण करुन खून करण्यात आला. तर पुण्यात भाजपाचे आमदार योगेश टिळेकर यांच्या मामाचं अपहरण करुन खून करण्यात आला. खासदार फोन करत असताना बीडचे पोलीस अधीक्षक फोन उचलत नाहीत, देवेंद्र फडणवीस यांना असं राज्य चालवायचं का, असा सवाल संजय राऊत यांनी केला. 100 शकुनी मेल्यानंतर एक शरद पवार जन्माला आल्याची टीका गोपीचंद पडळकर यांनी केली. याबाबत देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट करावं, असंही त्यांनी यावेळी सांगितलं.
कायदा सुव्यवस्थेवरुन संजय राऊत यांचा हल्लाबोल :बीड जिल्ह्यात संतोष देशमुख यांचा अपहरण करुन खून करण्यात आला आहे. त्यामुळे बीड जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली असून जमावानं रोडवर ठिय्या मांडून आंदोलन सुरू केलं. याबाबत संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर मोठा हल्लाबोल केला. याबाबत बोलताना त्यांनी सांगितलं, की "बीड आणि पुण्यात अपहरण करुन खून करण्यात आला आहे. बीडच्या पोलीस अधीक्षकांना खासदारानं फोन केल्यानंतर त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. पुण्यात तर भाजपा आमदारांच्या मामाचं अपहरण करुन खून करण्यात आला आहे. त्यामुळे राज्यात कायदा आणि सुव्यवस्था पार ढेपाळली आहे. देवेंद्र फडणवीस यांना असा राज्यकारभार करायचा आहे का," असं सवाल संजय राऊत यांनी यावेळी विचारला.