महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

देवेंद्र फडणवीस यांच्या भीष्म प्रतिज्ञेचं वास्तव काय? - Devendra Fadnavis Bhishma Pratigya - DEVENDRA FADNAVIS BHISHMA PRATIGYA

Devendra Fadnavis Bhishma Pratigya : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षणावरून होणाऱ्या आरोपाबाबत बोलताना मी राजकारणातून संन्यास घेईन, अशी नवी प्रतिज्ञा केली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी आतापर्यंत अनेक भीष्म प्रतिज्ञा केल्या आहेत. मात्र, त्या प्रतिज्ञांचं पुढं काय झालं? याबाबत जाणकारांची मतं आपण जाणून घेऊया.

Devendra Fadnavis, Manoj Jarange
देवेंद्र फडणवीस, मनोज जरांगे (Etv Bharat MH Desk)

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 20, 2024, 4:24 PM IST

मुंबई Devendra Fadnavis Bhishma Pratigya:राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सातत्यानं आपल्या विधानांबाबत चर्चेत असतात. ते राज्यातील जनतेला आश्वासित करण्यासाठी वेगवेगळ्या घोषणा करतात. त्यांच्या राजकारणाची सुरूवात देखील अशाच एका घोषणेनं झाली होती. 2004 मध्ये त्यांनी ही घोषणा केली होती, मात्र त्यानंतर त्यांनी या घोषणांकडं फारसं गांभीर्यानं पाहिल्याचं दिसत नाही. देवेंद्र फडणवीस यांनी आतापर्यंत कोणकोणत्या घोषणा केल्या आणि त्या घोषणांचं पुढं काय झालं हे आपण जाणून घेऊया.

संजय राऊत यांची पत्रकार परिषद (ETV BHARAT Reporter)

देवेंद्र फडणवीस यांच्या लोकप्रिय घोषणा :देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या राजकीय कारकीर्दीला सुरुवात करताना वेगळ्या विदर्भाबाबत 2004 मध्ये भीष्म प्रतिज्ञा केली होती. या प्रतिज्ञेबाबत तत्कालीन भाजपाचे नेते एकनाथ खडसे यांनीही विधानसभेत पुनरुच्चार केला होता. जोपर्यंत वेगळा विदर्भ होत नाही, तोपर्यंत मी लग्न करणार नाही, असं फडणवीस म्हणाले होते. मात्र, त्यानंतर आमदार, 2014 ला सत्तेत आल्यानंतर वेगळ्या विदर्भाबाबत भाजपाची भूमिका ठाम आहे, हे सांगण्यापलीकडं त्यांनी या प्रश्नाकडं फारसं लक्ष दिलं नाही. 2014 मध्ये देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेवर येण्यापूर्वी बारामतीत झालेल्या धनगर समाजाच्या मोर्चामध्ये जुलै 2014 मध्ये पुन्हा एक घोषणा केली होती. जर आम्ही सत्तेवर आलो, तर आठ दिवसात धनगर आरक्षणाचा प्रश्न सोडवू, अशी ती घोषणा होती.

राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाणार नाही :त्यानंतर युतीचं सरकार आलं, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. मात्र, धनगर आरक्षणाचा प्रश्न अद्यापही सुटलेला नाही. 2019 मध्ये त्यांनी मी पुन्हा येईन पुन्हा येईन, अशा पद्धतीची भीष्म गर्जना निवडणुकीच्या प्रचारादरम्यान केली होती. मात्र, त्यानंतर घडलेल्या राजकीय घडामोडी आणि नाट्यामुळं त्यांना पुन्हा मुख्यमंत्री होता आलं नाही. 2020 मध्ये एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेससोबत आम्ही जाणार नाही, अशी नवी भीष्म प्रतिज्ञा केली होती. त्यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसोबत जाणं आपद धर्म नाही, शाश्वत धर्म नाही, असं म्हटलं होतं. मात्र, त्यानंतर काही महिन्यातच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेससोबत घरोबा करत सत्ता स्थापन केली. राष्ट्रवादी काँग्रेससोबत आल्यानंतर त्यांनी आमदार नवाब मलिक यांच्या बाबत जोरदार विरोधी मोहीम चालवली होती.

नवाब मलिक राष्ट्रद्रोही :नवाब मलिक हे राष्ट्रद्रोही आहेत, त्यांचे राष्ट्रद्रोही गुंडांसोबत संबंध असल्याचे गंभीर आरोप फडणवीस यांनी केले होते. त्यामुळं त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला याबाबत एक पत्र लिहून नवाब मलिक यांना सोबत घेऊ नये, असं सांगितलं होतं. मात्र, नवाब मलिक यांना राष्ट्रवादी काँग्रेसनं आता आपल्या व्यासपीठावर घेतल्यानंतरही देवेंद्र फडणवीस यांनी त्याबाबत कोणतीही भूमिका स्पष्ट केलेली नाही. त्या पाठोपाठ आता देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षणाबाबत खोडा घातल्याचा आरोप जरांगे यांनी केला. या आरोपाला उत्तर देताना आरोप सिद्ध झाल्यास आपण राजकारणातून संन्यास घेऊ, अशी नवी भीष्म प्रतिज्ञा देवेंद्र फडणवीसांनी केली आहे. त्यामुळं त्यांच्या प्रतिज्ञाचं पुढं काय झालं, हे महाराष्ट्रानं पाहिलं आहे. यासंदर्भात जाणकारांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

मलिकांना मांडीवर बसवा : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक यांच्या संदर्भात फडणवीस यांनी कठोर भूमिका घेतली होती. त्या भूमिकेचं आता काय झालं?, असा सवाल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष) खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. नवाब मलिक राष्ट्रद्रोही आहेत, असं फडणवीसांचे आरोप होते. ते आरोप आता खोडले गेले आहेत का?, असा टोला त्यांनी फडणवीसांना लगावला. तसंच आता नवाब मलिकांवरील सर्व आरोप मागे घेतल्याचं त्यांनी जाहीर करावं, त्यांना युतीत सामावून घेत मांडीवर बसवावं, असा प्रहार राऊतांनी त्यांच्यावर केला आहे.

फडणवीस खोटं बोलणारे नेते :"देवेंद्र फडणवीस हे सत्तातूर नेते आहेत. त्यांची सत्ताकांक्षा खूप मोठी आहे. फडणवीस यांच्या या राजकारणामुळं महाराष्ट्रातील राजकारण गढूळ झालं असून खालच्या स्तराला गेलं आहे. आरक्षणाचा प्रश्न सरकारनं सोडवला असता, तर जरांगे यांना चारवेळा उपोषण करण्याची गरज नसती. मराठा आरक्षणासाठी मराठा समाजाला रस्त्यावर का यावं लागलं? आत्महत्या का कराव्या लागल्या, असा टोला शिवसेनेच्या (उबाठा) प्रवक्त्या सुषमान अंधारे यांनी लगावला. फडणवीस यांनी म्हटल्याप्रमाणे त्यांनी आता राजकीय संन्यास घ्यावा. त्यांना राजकीय संन्यास घेण्यासाठी ज्या काही गोष्टी आवश्यक असतील त्या सर्व गोष्टी मी द्यायला तयार आहे, असंही त्या म्हणाल्या. देवेंद्र फडणवीस यांनी आतापर्यंत अशा अनेक घोषणा केल्या आहेत, मात्र त्यांनी त्या कधीच पाळल्या नाहीत. त्यामुळं ते लबाडा घरचं आवतान आहे, त्यांना खोटं बोलण्याशिवाय काहीही येत नाही, त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवावा असं ते वागत नाहीत. त्यामुळं ते कधीही राजकीय संन्यास घेणार नाहीत", असंही अंधारे यांनी सांगितलं.

फडणवीसांच्या घोषणांना गांभीर्याने घेता येणार नाहीत : या संदर्भात बोलताना ज्येष्ठ राजकीय विश्लेषक पद्मभूषण देशपांडे यांनी सांगितलं की, देवेंद्र फडणवीसांच्या ठामपणे बोलण्यावर लोकांना विश्वास ठेवावा असं वाटतं. ते भावनातिरेकानं असं टोकाचं बोलतात. त्यांच्या राजकीय घोषणा ह्या केवळ राजकीयच आहेत. गेल्या वीस वर्षापासून ते असंच बोलतात. त्यांनी घोषणा केल्यानंतर त्या पाळल्या नाही. सध्या महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा प्रश्न अत्यंत शिगेला पोहोचला आहे. या प्रश्नाबाबत राज्यात अस्वस्थता आहे. सरकारनं विविध योजना आणून लोकांचं लक्ष वळवण्याचा प्रयत्न केला असला, तरी हा मुद्दा पुन्हा चर्चेत येणार आहे. एक मोठा समुदाय आपल्यावर नाराज राहील, हे राजकीयदृष्ट्या त्यांना परवडणारं नाही. म्हणून या समाजाचा रोष कमी करण्यासाठी त्यांनी आरोप झटकून टाकण्यासाठी नवीन भीष्मप्रतिज्ञा केली आहे. परंतु, ही प्रतिज्ञा सुद्धा गांभीर्यानं घ्यावी, असं मला वाटत नाही.

ABOUT THE AUTHOR

...view details