पुणेSanjay Raut On Congress MLA : काल विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत महायुतीच्या सर्व 9 उमेदवारांचा विजय झाला. तर महाविकास आघाडीच्या तीनपैकी दोन उमेदवारांचा विजय झाला. तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं पाठिंबा दिलेले शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील पराभूत झाले. काल झालेल्या निवडणुकीत काँग्रेसची 7 मतं फुटली असल्याचं सांगितलं जात आहे. आता यावर शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, कालच्या विधानपरिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसची 7 मतं फुटली असून याच काँग्रेसच्या 7 गद्दारांनी मागच्यावेळी चंद्रकांत हांडोरे यांचा पराभव केला आहे. तसंच काल मोठ्या प्रमाणात आमदारांना पैसे तसंच दोन एकर जमीन देण्यात आली आहे. एकेका आमदाराला 20 ते 25 कोटी रुपये देण्यात आले असल्याचं यावेळी राऊत म्हणाले.
गद्दारांना निवडून आणण्यासाठी ही निवडणूक :पुण्यात शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. यावेळी काल झालेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीच्याबाबत ते म्हणाले की, महायुतीचे लोक अशा पद्धतीने विजयोत्सव साजरा करत आहेत जणू त्यांनी महाराष्ट्र जिंकला आहे. कालच्या निवडणुकीचा अभ्यास केला तर भाजपाचे १०३ आमदार आणि त्यांना काही आमदारांचा पाठिंबा असल्यानं त्यांचे लोकही जिंकून आले आहेत. तसंच जे दोन गद्दार गट आहेत त्यांनी त्यांच्या आमदारांना जिंकून आणलं आहे. गद्दारांनी गद्दारांना निवडून आणण्यासाठीची कालची ही निवडणूक होती. महाविकास आघाडीला कुठलाही फटका बसलेला नाही. काँग्रेसने काँग्रेसचा उमेदवार हा जिंकून आणला आहे तर शिवसेनेकडे कोटा नसताना देखील आम्ही काँग्रेसच्या मदतीने आमचा उमेदवार हा जिंकून आणला आहे, असं यावेळी राऊत म्हणाले.
फुटीर आमदारांना ही ऑफर :ते पुढे म्हणाले की, काँग्रेसची ७ मतं फुटली आहेत आणि ते लपून राहिलेलं नाही. याचं आश्चर्य देखील नाही; कारण हे ७ लोक आधीच फुटलेले आहेत. मागच्या विधानपरिषदेच्या निवडणुकीत चंद्रकांत हांडोरे यांचा पराभव करणारे हेच ७ लोक होते. आम्हाला फार मोठा धक्का बसला आहे असं काही नाही. काँग्रेसची जी ७ मतं फुटली आहेत ते लोक गेल्या २ वर्षांपासून काँग्रेससोबत नाहीत. याच ७ लोकांना घेऊन यांनी कालचा खेळ केला आहे. तसंच काल आमदारांचा भाव हा शेअर बाजाराप्रमाणे वाढत होता. एका एका आमदाराला २० ते २५ कोटी रुपये देण्यात आले. तसंच २ एकर जमीन देखील देण्यात आली आहे, असं यावेळी संजय राऊत म्हणाले.