मुंबईSanjay Nirupam criticizes Uddhav Thackeray : मुंबईच्या उत्तर-पश्चिम लोकसभा जागेवरून महाविकास आघाडीमध्ये मतभेद वाढत असल्याचं दिसून येत आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानं शनिवारी या मतदारसंघात अमोल कीर्तिकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. यावरून काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी प्रश्न उपस्थित केला आहे.
जागावाटपाचा अंतिम निर्णय अद्याप नाही :संजय निरुपम यांनी एक्स मीडियावर पोस्ट करत नाराजी व्यक्त केली. त्यांनी म्हटले की, " शिवसेनेनं (ठाकरे गट) उत्तर-पश्चिम जागेवरून उमेदवार घोषित केला आहे. महाविकास आघाडीच्या दोन डझन बैठका होऊनही जागावाटपाचा अंतिम निर्णय अद्याप झालेला नाही. या मतदारसंघात आद्यापही जागेवर चर्चा झालेली नाहीय. प्रलंबित असलेल्या 8-9 जागांपैकी ही एक जागा आहे. ठाकरे गटानं उमेदवार जाहीर करणं हे युती धर्माचे उल्लंघन नाही का असा सवाल खासदार निरुपम यांनी केला आहे. काँग्रेसचा अपमान करण्यासाठी जाणीवपूर्वक असं कृत्य केलं जात आहे, असं काँग्रेस नेते निरुपम यांनी म्हटलंय. काँग्रेसच्या सर्वोच्च नेतृत्वानं या प्रकरणात हस्तक्षेप करावा, असंदेखील त्यांनी त्याच्या 'X' वर लिहलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. "ठाकरे गटानं ज्यांचं नाव सुचवलं त्यांच्यावर खिचडी घोटाळ्याचा आरोप आहे. त्यांनी कोविड काळात खिचडी पुरवठादाराकडून चेकनं लाच घेतल्याचा आरोप आहे. कोविडच्या काळात, स्थलांतरित मजुरांना मोफत अन्न देण्याचा BMC कडून एक स्तुत्य कार्यक्रम होता. त्यावेळी गरिबांना जेवण देण्याच्या योजनेतून ठाकरे गटाच्या उमेदवारानं कमिशन घेतलं. याप्रकरणी ईडी त्यांची चौकशी करत आहे."
कार्यकर्ते अशा उमेदवाराचा प्रचार का करतील? : काँग्रेस, शिवसेनेना (ठाकरे गटाचे) कार्यकर्ते अशा घोटाळेबाज उमेदवाराचा प्रचार करणार का, असा सवाल संजय निरुपम यांनी केला. या जागेवर संजय निरुपम काँग्रेसच्यावतीनं सातत्यानं दावा करत आहेत. मात्र, शनिवारी अचानक उद्धव ठाकरे यांनी या जागेवर आपला उमेदवार जाहीर केला. त्यामुळं संजय निरूपम नाराज असल्याची चर्चा सुरू आहे. उद्धव ठाकरे यांनी उत्तर-पश्चिम मतदारसंघातून अमोल कीर्तीकर यांना उमेदवारी दिली आहे. अमोल कीर्तीकर यांचे वडील गजानन कीर्तीकर हे या जागेवरून विद्यमान खासदार असून ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेशी संबंधित आहेत.
पिता-पुत्राच्या लढाईत लॉटरी लागण्याची शक्यता? : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप रविवारी 17 मार्च रोजी मुंबईतील शिवाजी पार्कवर होणार आहे. यावेळी इंडिया आघाडीचे प्रमुख नेते शरद पवार आणि उद्धव ठाकरे हेही उपस्थित राहणार आहेत. त्याचवेळी लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचं रणशिंग फुंकलं जाणार आहे. अशा स्थितीत उद्धव ठाकरेंनी काँग्रेस नेत्यांना विचारात न घेता अमोल कीर्तीकर यांच्या नावाची घोषणा केल्यानं काँग्रेस नेते संजय निरुपम याला उत्तर देणार आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी यांना ते आपली भूमिका स्पष्ट करतील, असंही सांगण्यात येत आहे. त्यामुळं या जागेसाठी संजय निरुपम इच्छुक असून पिता-पुत्राच्या भांडणात त्यांना लॉटरी लागण्याची शक्यता आहे. या सगळ्या घडामोडींनंतर आता संजय निरुपम काय भूमिका घेतात? ते पाहावं लागणार आहे.
हे वाचलंत का :
- ...तर बारामतीतून सुनेत्रा पवारच उमेदवार; सुनील तटकरेंनी स्पष्टच सांगितलं
- 'सरकारला निष्पक्ष निवडणुका नको आहेत'; अरुण गोयल यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेससह तृणमूल काँग्रेसची भाजपावर टीका
- लालूप्रसाद यादवांचे निकटवर्तीय राजद नेते सुभाष यादवांना ईडीकडून अटक; काय आहे प्रकरण?