मनमाड Sambhaji Bhide : आपल्या वक्तव्यांवरुन कायम चर्चेत राहणाऱ्या संभाजी भिडे यांना मनमाडमध्ये काळे झेंडे दाखवण्यात आले. मनमाडमार्गे धुळे इथं कार्यक्रमाला जात असताना मनमाड येथे आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यांनी संभाजी भिडेंना काळे झेंडे दाखवले. यावेळी भिडेंच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. पोलिसांनी आंदोलनकर्त्याना अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, आंदोलनकर्त्यांनी ऐकलं नाही. संभाजी भिडेंच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
ताफा अडवत दाखवले काळे झेंडे : संभाजी भिडे यांना काल मनमाड शहरात काळे झेंडे दाखवून व त्यांचा ताफा अडवून निषेध करण्यात आला. यावेळी संभाजी भिडेंच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यामुळं याठिकाणी मोठ्या प्रमाणावर वातावरण तापलं होतं. संभाजी भिडे हे नियोजित दौऱ्यावर होते. येवला येथील कार्यक्रम आटोपून ते मनमाडमार्गे धुळ्याकडे जात होते. यावेळी मनमाड येथील अयोध्या नगर परिसरात झालटे वस्तीवर त्यांच्या स्वागताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रम आटोपून पुणे इंदौर मार्गानं भिडेंचा ताफा मालेगावकडे जात असताना शहरातील पाकिजा कॉर्नर याठिकाणी आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यांनी त्यांचा ताफा अडवत, काळे झेंडे दाखवत त्यांचा निषेध केला. यावेळी पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र आंदोलनकर्त्यानी त्यांचा ताफा अडवून धरत जोरदार घोषणाबाजी केली, यामुळं परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता.