मुंबई -अभिनेता सलमान खानला मिळणाऱ्या धमक्यांचे सत्र सुरुच आहे. मुंबई वाहतूक पोलिसांच्या व्हॉट्सॲप नंबरवर सलमान खानची हत्या करण्यात येईल, असा धमकीचा मेसेज आला आहे. यात अभिनेता सलमान खानकडे 5 कोटी रुपयांची मागणी करण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दिकी यांच्या हत्या प्रकरणाचा तपास मुंबई पोलीस गुन्हे शाखा करत आहे. बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात मुंबई पोलीस गुन्हे शाखा झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरण आणि अभिनेता सलमान खान या दोन्ही कांगोऱ्यांचा तपास करत आहे. या तपासात गुन्हे शाखेकडून विविध अँगलची पडताळणी केली जात आहे. प्रकरणात आता एक नवी अपडेट समोर येत आहे. सलमान खानला धमकी देणारा मुंबई वाहतूक पोलिसांना मेसेज आल्याची माहिती समोर आली आहे. या मेसेजमध्ये अभिनेता सलमान खान व लॉरेन्स बिश्नोई यांच्यामधील वाद संपवायचा असल्यास सलमान खाननं पाच कोटींची रक्कम द्यावी, अशी मागणी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मेसेज पाठवणाऱ्या व्यक्तीनं स्वतःला लॉरेन्स बिश्नोई टोळीचा जवळचा असल्याचं म्हटलं आहे.
मुंबई पोलिसांकडून चौकशी सुरू-अज्ञात व्यक्तीनं मुंबई वाहतूक पोलिसांना व्हॉट्सअप केला. यामध्ये म्हटलं की, "हे हलक्यात घेऊ नका. जर सलमान खानला जिवंत राहायचे असेल आणि लॉरेन्स बिश्नोईशी शत्रुत्व संपवायचे असेल तर त्याला 5 कोटी रुपये द्यावे लागतील. जर पैसे दिले नाहीत तर सलमान खानची अवस्था बाबा सिद्दीकींपेक्षाही वाईट होईल." या प्रकरणी वरळी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
सलमान खानच्या सुरक्षेत वाढ-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते बाबा सिद्दिकी आणि अभिनेता सलमान खान यांचे मैत्रीपूर्ण संबंध सर्वांनाच माहिती आहेत. बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर अभिनेता सलमान खानच्या सुरक्षितदेखील वाढ करण्यात आली. बाबा सिद्दिकी हत्या प्रकरण आणि आता पुन्हा आलेला धमकीचा मेसेज यामुळे अभिनेता सलमान खानला आता Y+ सुरक्षा देण्यात येणार आहे. त्याच्या सुरक्षेसाठी सुमारे 25 पोलीस तैनात करण्यात आले आहेत. यामध्ये 25 सुरक्षारक्षकांमध्ये 2 ते 4 NSG कमांडो आणि पोलिस सुरक्षा कर्मचारी राहणार आहेत. याशिवाय दोन ते तीन पोलिस वाहनांचा ताफा सलमान खान सोबत असणार आहे. या वाहनांच्या ताफ्यात सलमान खानसाठी एका बुलेटप्रूफ वाहनाचा देखील समावेश असणार आहे.
हेही वाचा-
- गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या धमक्या असतानाही, सलमान खान सुरू ठेवणार 'सिकंदर'चे शूटिंग?
- सलमान खान आणि लॉरेन्स बिश्नोईमध्ये मांडवली करण्यासाठी पुढं आली सोमी अली, पाहा पोस्ट
- सलमान खान धमकी प्रकरण: हत्येच्या कट रचणाऱ्या मोस्ट वाँटेड आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या