मुंबई - बॉलीवूड अभिनेता सैफ अली खान याच्या घरातील चोरी आणि हल्ला प्रकरणातील आरोपी मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजादला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी ठोठावण्यात आली आहे. आरोपीला वांद्रे येथील महानगर दंडाधिकारी न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. आरोपीला 29 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. ती आज संपल्यानं त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात आलं होतं.
या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलिसांतर्फे, आरोपीकडून आणखी माहिती मिळवण्यासाठी आरोपीला आणखी दोन दिवस पोलीस कोठडी देण्याची मागणी केली. मात्र,आरोपी दहा दिवस पोलीस कोठडीत होता. याकडे न्यायालयानं लक्ष वेधलं आणि आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावली.
या प्रकरणाचा तपास करण्यासाठी एक टीम कोलकाता येथे पाठवली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीनं हुशारीनं गुन्हा करण्यापूर्वी रेकी आणि पूर्व तयारी केली आहे. त्याचा आणखी साथीदार असल्याचा संशय आहे. याबाबत अधिक तपास करायचा आहे. त्यामुळे दोन दिवस पोलीस कोठडी वाढवून मिळावी, अशी मागणी पोलिसांतर्फे करण्यात आली.
या प्रकरणाची चौकशी पूर्ण झाल्याचं कागदपत्रांवरुन दिसत आहे. पोलीस कोठडी देण्यासाठी काही मुद्दा समोर आलेला नाही, असं मजिस्ट्रेट म्हणाले. काही नवीन पुरावा, मुद्दा आला तर, कोलकत्यातील टीमने काही वेगळी माहिती दिली आणि तुम्हाला चौकशी करायची असेल तर तुम्ही पुन्हा पोलीस कोठडी मागू शकता, त्यामुळे आता त्याला न्यायालयीन कोठडी देतो, असं मॅजिस्ट्रेटनी स्पष्ट केलं.
आरोपीने भारतात बेकायदा पध्दतीनं प्रवेश केल्यानंतर मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद हे त्याचं नाव बदललं आणि तो विजय दास नावाने राहू लागला. त्याला ठाणे येथून अटक करण्यात आली होती. 16 जानेवारीला सैफ अली खानच्या घरात घुसून त्यानं चोरीचा प्रयत्न केला आणि सैफवर हल्ला केला, असं आतापर्यंतच्या पोलिस तपासात समोर आलं आहे. आरोपीकडून जप्त करण्यात आलेलं शस्त्र पुढील तपासणीसाठी फॉरेन्सिक सायन्स प्रयोगशाळेत पाठवण्यात आलं आहे.
हेही वाचा..
- सैफ हल्ला प्रकरणाबाबत मुंबई पोलिसांनी उलगडले 'हे' तीन मुद्दे; फिंगर प्रिंटबाबत दिलं स्पष्टीकरण
- सैफ अली खान प्रकरण; ताब्यात घेतलेला तरुण वेडा झाल्याचा वडिलांचा दावा, मुलाला नोकरी देण्याची मागणी
- 'मुंबई पोलिसांच्या चुकीमुळे माझे आयुष्य उद्ध्वस्त झालं', सैफ अली खान हल्ल्याप्रकरणी पकडलेल्या आकाशचा दावा...