मुंबई: अभिनेता सैफ अली खानवर (Saif Ali Khan) गुरुवारी घरात घुसून हल्ला करण्यात आला होता. या प्रकरणी अखेर तीन दिवसांनी मुंबई पोलिसांनी मुख्य आरोपीला अटक केली. आरोपीला सध्या पाच दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. आरोपीच्या शोधासाठी मुंबई पोलिसांसह गुन्हे शाखेच्या जवळपास 35 टीम काम करत होत्या. या टीममधील पोलिसांचा सन्मान सोमवारी मुंबईत करण्यात आला.
मुंबई पोलिसांचा सन्मान : अभिनेता सैफ अली खान हल्ल्यातील आरोपी मोहम्मद शरीफुल इस्लाम शेहजाद याला अटक करणाऱ्या टीमचा मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयात कायदा व सुव्यवस्था विभागाचे सह पोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. वांद्रे पोलीस स्टेशनमधील 75 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱयांचा सन्मान करण्यात आला.
बांगलादेशी घुसखोरांविरोधात सर्च ऑपरेशन : आरोपीला अटक केल्यानंतर न्यायालयानं त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. आरोपी हा बांगलादेशी असल्याचा दावा पोलिसांनी केला होता, तर तो दावा आरोपीच्या वकिलांनी फेटाळला होता. त्यामुळं तेव्हापासून बांगलादेशी घुसखोरांविरोधात मुंबई, ठाण्यात सर्च ऑपरेशन राबवण्यात आलं होतं.
आरोपी वरळी येथे क्लबमध्ये काम करत होता: पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मोहम्मद शरीफुल शहजाद वरळी येथे ज्या क्लबमध्ये काम करत होता, तिथे त्यानं एका कस्टमरची अंगठी चोरण्याचा प्रयत्नही केला होता. याप्रकरणी त्याला पकडण्यात आलं होतं. त्यावेळी कस्टमरनं कोणतीही तक्रार दाखल केली नव्हती. मात्र त्याला कामावरून काढून टाकण्यात आलं होतं. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात त्यानं चोरी करण्याचा प्रयत्न केला होता.
हेही वाचा -
- अभिनेता सैफ अली खान हल्ला प्रकरणातील संशयित छत्तीसगडमध्ये ताब्यात, मुंबई पोलीस घेणार ताबा
- सैफ अली खानसह शाहरुखचा बंगला कोणाच्या निशाण्यावर? पोलिसांनी संशयिताला घेतलं ताब्यात!
- सैफ अली खान चाकू हल्ला प्रकरण: आरोपीनं केली एक कोटींची मागणी, मोलकरणीच्या जबाबात उघड