शिर्डी Sai Baba Idol Controversy : वाराणसीतील विविध मंदिरांमधून साईबाबांच्या मूर्ती हटवण्यात आल्या असून, त्याचा शिर्डीतील साईभक्तांकडून निषेध करण्यात येत आहे. मंदिरांमधून साईबाबांच्या मूर्ती हटवल्या, मात्र आमच्या मनातील मूर्ती कशी हटवणार, असा सवाल शिर्डीत साई दर्शनासाठी येणाऱ्या साईभक्तांकडून केला जातोय.
14 मंदिरांमधून साईबाबांच्या मूर्ती हटवल्या : साईबाबांची पूजा करण्याबाबतही यापूर्वी प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. आता पुन्हा एकदा वाराणसीतील 14 मंदिरांमधून साईबाबांच्या मूर्ती हटवण्यात आल्या आहेत. कालीचरण महाराज नुकतेच शिर्डीत आले होते. त्यावेळी बोलताना त्यांनी साईबाबा एका विशिष्ट धर्माचे होते हे दाखवण्याचा कट रचला जात असल्याचं सांगितलं होतं. मात्र, दुसरीकडे सनातन रक्षक समितीनं उत्तर प्रदेशात साईंच्या मूर्ती हटवण्याची मोहीम हाती घेतली आहे.
साईभक्त आणि ग्रामस्थांकडून निषेध :वाराणसीतील साईंच्या मूर्ती हटवल्या जात असल्याचा शिर्डीतून साईभक्त आणि ग्रामस्थांनी निषेध केलाय. "साईबाबांनी 'सबका मालिक एक'चा संदेश दिला त्यांनी स्वतःला कोणत्या धर्मात वाटून घेतलं नव्हतं," असं शिर्डी ग्रामस्थ कमलाकर कोते यांनी सांगितलं.